मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या जोडीने केलेल्या चाबूक बॉलिंगमुळे टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील शेवटच्या दिवशी इंग्लंडवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 85.1 ओव्हरमध्ये 367 धावांवर गुंडाळलं. यासह भारताने 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं आहे. भारताच्या विजयात मोहम्मद सिराज याने प्रमुख भूमिका बजावली. सिराजने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर प्रसिधने इंग्लंडच्या 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत सिराजला अप्रतिम साथ दिली. तर आकाश दीप याने 1 विकेट घेत दोघांना मदत केली.
इंग्लंडने 367 धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी 6 विकेट्स गमावून 76.2 ओव्हरमध्ये339 धावा केल्या होत्या. त्यानंतर खराब प्रकाश आणि पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपवण्यात आला. त्यामुळे आता इंग्लंडला पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी 35 धावांची गरज होती. तर दुखापतग्रस्त ख्रिस वोक्स खेळणार असल्याने भारताला 4 विकेट्सची गरज होती. मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या जोडीने 2-2 विकेट्स घेत इंग्लंडला गुंडाळलं आणि भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.