करिश्मा कपूरच्या पूर्व पतीच्या संपत्तीवरून वाद; सावत्र लेकीमुळे नवा ट्विस्ट, मोठा गेम समोर?
Tv9 Marathi August 05, 2025 05:45 PM

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना हार्ट अटॅकने निधन झालं. संजय कपूरच्या अकस्मात निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता त्याच्या 30 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवरून वाद सुरू आहे. एकीकडे संजयच्या आईने ब्रिटिश सरकारकडे त्याच्या निधनाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संजयच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे संपत्तीच्या वादादरम्यान संजयची सावत्र मुलगी सफिराचं नाव चर्चेत आलं आहे. संजयच्या निधनानंतर सफिराला त्याच्या संपत्तीतून वाटा मिळणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. अशातच सफिराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून खऱ्या वडिलांचं आडनाव काढून टाकलं आहे.

कोण आहे सफिरा?

सफिरा, ही संजय कपूरचीतिसरी पत्नी प्रिया सचदेवच्या पहिल्या लग्नातून झालेली मुलगी आहे. प्रिया सचदेवने हॉटेल बिझनेसमन विक्रम चटवालशी लग्न केलं होतं. या दोघांना सफिरा ही मुलगी आहे. त्यानंतर 2017 मध्ये प्रियाने संजय कपूरशी लग्न केल्यानंतर सफिरा त्यांच्या कुटुंबाचा भाग बनली.

संजय कपूरने सफिराला घेतलं दत्तक?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय कपूरने प्रियाशी लग्न केल्यानंतर सफिराला कायदेशीर पद्धतीने दत्तक घेतलं होतं. यामुळे ती कायदेशीररित्या वारस बनली. परंतु तरीही असा दावा केला जात आहे की सफिरा तिचे खरे वडील विक्रम यांचं आडनाव लावायची. परंतु आता काही दिवसांपूर्वीच तिने वडिलांचं ‘चटवाल’ हे आडनाव काढून टाकलं आहे. यामुळे संजय कपूरच्या संपत्तीत तिला वाटा मिळण्यावरून चर्चा सुरू झाली आहे. परंतु याबाबत अद्याप अधिकृत अशी कोणतीच माहिती समोर आली नाही.

असाही दावा केला जात आहे की सफिराच्या आधी तिची आई आणि संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेवनेही तिच्या नावापुढे ‘कपूर’ असं आडनाव जोडलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचं नाव प्रिया एस. कपूर असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे ती आता ‘सोना कॉमस्टार’ या कंपनीच्या बोर्डातही सहभागी झाली आहे. या कंपनीच्या अध्यक्षपदी संजय कपूर होता. आता त्याच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीतून प्रिया, सफिरा आणि करिश्मा कपूरच्या मुलांना काय मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.