केस ओढले, नको त्या जागी मारला ठोसा.. डर्टी इंडियन म्हणत हल्ला, आयर्लंडमध्ये चिमुकलीसोबत काय घडलं ?
GH News August 07, 2025 06:09 PM

आयर्लंडमध्ये भारतीय वंशाचे लोक अनेकदा वांशिक हल्ल्यांचे बळी ठरले आहेत. यावेळी एका सहा वर्षांच्या मुलीला लक्ष्य करण्यात आल्याचा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. तिथे भारतीय वंशाच्या अवघ्या 6 वर्षांच्या मुलीवर काही मुलांच्या ग्रुपने निर्घृणपणे हल्ला केला. रिपोर्टनुसार, मुलीची आई गेल्या 8 वर्षांपासून आयर्लंडमध्ये राहत आहे आणि ती व्यवसायाने नर्स आहे. टीनएजर्सच्या एका गटाने मुलीला तिच्या घराबाहेर सायकल चालवताना पकडले आणि तिला मारहाण केली. ‘डर्टी इंडियन, भारतात परत जा’ असे शब्द वापरत त्यांनी तिचा अपमान केला अशीही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

पीडित मुलगी जेव्हा तिच्या घराबाहेर खेळत होती तेव्हाच हा प्रकार घडला. तिची आई तेव्हा 10 महिन्यांच्या मुलाला दूध पाजण्यासाठी घरात गेली होती. मात्र अवघ्या काही मिनिटांतच ती मुलगी रडत रडत घरात आली. ती इतकी घाबरलेली, भेदरलेली होती की तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते, नक्की काय घडलं हे ती तिच्या आईला धड सांगूही शकली नाही. मात्र तिच्या मित्रांनी संपूर्ण कहाणी तिच्या आईला सांगितली. काही टीनएजर मुलांनी त्या लहान मुलीच्या तोंडावर ठोसे मारले आणि तिच्या प्रायव्हट पार्टवरही मारलं असं त्यांनी सांगितलं.

6 वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण

कोणतीही चिथावणी दिलेली नसताना हा हल्ला करण्यात आला असं पीडित मुलीच्या आईने सांगितलं. या हल्ल्यामुळे ती मुलगी तर भेदरली आहेच पण संपूर्ण कुटुंबच भीतीच्या सावटाखाली असल्याचं त्यांनी नमूदल केलं. तिथे ( त्या देशात) माझी मुलगी असुरक्षित असेल असा विचारही मी कधीच केला नव्हता. मी आयर्लंडला माझं घर मानत होतो, पण आज मला इथे खूप असहाय्य वाटतंय अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या. .

त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलांनी प्रथम लहान मुलीचे केस ओढले आणि तिच्या चेहऱ्यावर मुक्का मारला. त्यानंतर, ती मुलगी जी सायकल चालवत होती, त्याच सायकलच्या चाकाने तिच्या प्रायव्हेट पार्टवरही वार केले आणि मुलीच्या मानेवरही हल्ला केला. हल्ला करणारी मुलं हे सगळं करूनही क्रूरपणे हसत होती, ते अतिशय भीतीदायक होतं, असं मुलीने सांगितल्याचं तिच्या आईने नमूद केलं.

पोलिसांत तक्रार दाखल

घटनेनंतर, मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली, परंतु तिला असं वाटतं की या मुलांना शिक्षा करण्याऐवजी त्यांचे समुपदेशन केले पाहिजे. त्यांना हे समजावून सांगितले पाहिजे की कोणाशीही असे वागणे चुकीचे आहे. आयर्लंडमध्ये भारतीय समुदायावर हल्ले वाढत असताना ही घटना उघडकीस आली आहे. अलिकडेच डब्लिनमध्ये एका भारतीय व्यक्तीला क्रूरपणे मारहाण करण्यात आली, तर एका टॅक्सी चालकावर दोन बनावट ग्राहकांनी बाटलीने हल्ला केला. या सर्व घटनांमध्ये लोकांना त्यांच्या देशात परतण्यास सांगण्यात आले होते. या घटनांनंतर, आयर्लंडमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी सावधगिरीचा सल्ला जारी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.