भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आपला पाया एकदम भक्कम रोवला आहे. इंग्लंड कसोटी मालिका त्याचं उत्तम उदाहरण आहे. आता भारतीय संघ व्हाईट बॉल क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आशिया कप स्पर्धा होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी येत्या काही दिवसात संघ जाहीर केला जाईल. तत्पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पण या स्पर्धेतून ऋषभ पंत आऊट झाल्याची माहिती समोर आली आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत जखमी झाला होता. ख्रिस वोक्सचा चेंडू त्याच्या बुटावर जोरात आदळला होता. त्यात त्याच्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे आता सहा आठवडे टीम इंडियातून बाहेर असणार आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेला मुकेल. इतकंच काय तर वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळणार नाही.
ऋषभ पंत आणि दुखापत आता हे समीकरण ठरलं आहे. अपघातातून वाचल्यानंतर ऋषभ पंतने मैदानात परतण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच कमबॅक करत मैदानात चांगली कामगिरी केली. पण आताही दुखापत त्याची पाठ सोडत नाही. आता त्याची जागा भरण्यासाठी निवड समितीला योग्य पर्याय निवडावा लागेल. विकेटकीपर फलंदाजाची जागा भरण्याचं मोठं आव्हान आता निवड समितीसमोर असणार आहे. तसं पाहीलं तर टी20 फॉर्मेटमध्ये बरेच पर्यात निवड समितीपुढे आहेत. अशा स्थितीत संजू सॅमसन किंवा केएल राहुलचा विचार होऊ शकतो. कारण हे दोघंही विकेटकीपर फलंदाज आहेत.
ऋषभ पंत इंग्लंडविरुद्ध पाच पैकी चार कसोटी सामना खेळला. पहिल्या कसोटी सामन्यात तर सलग दोन डावात शतकं ठोकली. एकूण चार सामन्यातील 7 डावात त्याने 68.42 च्या सरासरीने 479 धावा केल्या. इतकंच काय तर चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात फ्रॅक्चर असताना मैदानात उतरला आणि फलंदाजी केली. तसेच अर्धशतक पूर्ण केलं. पंतने इंग्लंड दौऱ्यात 2 शतकं आणि 3 अर्धशतकं ठोकली. कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.