‘कॅफे कॉफी डे’ म्हणजेच CCD सर्वांनाच परिचित असलेले नाव…कर्नाटकमधील व्ही. जी. सिद्धार्थ यांनी 1996 मध्ये देशभरात कॉफी शॉपची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. मात्र 2019 मध्ये अचानक त्यांनी आत्महत्या केली. कर्जबाजारीपणा आणि व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय त्यांच्या शेवटच्या पत्रावरून व्यक्त करण्यात आला. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कॉफी डे कंपनी चालू राहणार नाही, असे अनेकांना वाटत होते. त्यावेळी सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी ही जबाबदारी स्वीकारली.
कोण आहेत मालविका हेगडे?
मालविका हेगडे या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांच्या कन्या आहेत. 1969 मध्ये बेंगळुरू शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांनी बेंगळुरू विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. 1991 मध्ये व्ही जी सिद्धार्थ यांच्याशी त्यांचे लग्न झाले. सीसीडीच्या सीईओ होण्यापूर्वी त्या अनेक वर्षांपासून या कंपनीच्या स्वीकृत सदस्य होत्या.
मालविका यांनी सिंगल वुमन आणि दोन मुलांची आई असूनही सीसीडी बंद होण्यापासून वाचविण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये सीसीडीच्या नावे 7 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र हे आव्हान स्वीकारत 2020 मध्ये, मालविका यांनी सीसीडीचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. सीईओ म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी मालविका यांनी कंपनीच्या 25,000 कर्मचार्यांना एक पत्र लिहीत कॅफे कॉफी डे ब्रॅंड जतन करण्यास त्या सक्षम असल्याचे आश्वासन दिले.
मालविका हेगडे यांनी दोनच वर्षात व्यवसाय सावरला आणि त्याला उभारी दिली. कोरोना काळात जेव्हा अनेक कंपन्या बंद पडल्या तेव्हा सुद्धा मालविका यांना सीसीडी सुरू ठेवण्यात यश आले. याउलट सीसीडीचा विस्तार होत राहिला. पतीच्या निधनानंतर कर्जबाजारी कंपनीला नवसंजीवनी देणाऱ्या मालविका हेगडे यांचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. कारण एखादी कंपनी किंवा व्यवसाय सुरू करण्यापेक्षा तो टिकवून ठेवणे आव्हानात्मक असते. मात्र या महिलेने ते आव्हान पेलून दाखवले.
CCD या नावाला कोणत्याही ओळखीची आज गरज राहिलेली नाही. सिद्धार्थ यांच्या निधनानंतर कंपनी आता बंद होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र एका स्त्रीशक्तीने असे होऊ दिले नाही. सीसीडी हा सध्या भारताचा सर्वात मोठा कॉफी सर्व्हिंग ब्रँड आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत मालविका यांनी अल्पावधीतच यशाचे एक अद्भुत उदाहरण उभे केले.