Musalwadi Lake:'मुसळवाडी तलाव १०० टक्के भरला'; पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला, लाभधारक गावांमध्ये समाधान
esakal August 08, 2025 04:45 PM

राहुरी: मुसळवाडी येथील ब्रिटिशकालीन तलाव पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरला आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे मुसळवाडी तलावात पाणी सोडण्यात आले. या तलावातून पिण्याच्या पाणी योजना व शेती सिंचनासाठी पाणी दिले जाते. सुमारे २० गावांचा पिण्याचे पाणी व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे तलावाच्या लाभधारक गावांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणी

मुसळवाडी येथे १८९ दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचा ब्रिटिशकालीन तलाव आहे. भंडारदरा धरणाचा हा शेवटचा तलाव (टेल टॅंक) आहे. राहुरी तालुक्यासाठी भंडारदरा धरणातील १५ टक्के पाणी आरक्षित आहे. भंडारदरा उजव्या कालव्यातून मुसळवाडी तलावासाठी पाणी सोडले जात होते. परंतु निळवंडे धरण झाल्यापासून मुसळवाडी तलावाचे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून मुळा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे मुसळवाडी तलाव भरला जात आहे.

राहुरी तालुक्यात खरिपाच्या पेरण्या झाल्यावर पावसाने पाठ फिरवली आहे. त्यात मुसळवाडी तलावात अवघे २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. तलावातील गाळ, शेवाळ व इतर वनस्पतींमुळे पाणीपातळी खालावल्यावर अत्यंत खराब पाणी शिल्लक राहते. त्यामुळे पिण्याच्या पाणी योजनांना खराब व पिण्यासाठी अयोग्य पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तलावाच्या लाभधारक गावांमध्ये चिंता निर्माण झाली होती.

यंदा मुळा धरणाच्या पाणलोटात चांगला पाऊस झाल्याने धरण ८९ टक्के भरले आहे. मुळा धरणातून मागील महिन्यात खरीप हंगामासाठी सिंचनाचे आवर्तन सोडण्यात आले. अतिरिक्त पुराचे पाणी धरणाच्या दरवाजांद्वारे मुळा नदीपात्रात जायकवाडी धरणासाठी सोडण्यात आले. यावेळी मुळा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे अतिरिक्त पुराचे पाणी मुसळवाडी तलावात सोडून तलाव भरण्यात आला आहे. त्यामुळे तलावाच्या लाभधारक गावांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

माेठी बातमी! 'गुंठ्यांची खरेदी विहीर, घर, रस्त्यासाठीच परवानगी मिळणार'; शासनाच्या नव्या नियमावलीची लागली प्रतीक्षा

मुसळवाडी जलाशयातून पिण्याच्या पाणी योजनांद्वारे मुसळवाडी, टाकळीमिया, मोरवाडी, वाघाचा आखाडा, लाख, जातप, दरडगाव, त्रिंबकपूर, मालुंजा खुर्द, महालगाव, खुडसरगाव, माहेगाव, पाथरे खुर्द, शेनवडगाव, कोपरे, तिळापूर, बोरीफाटा, वांजुळपोई आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो, तसेच म्हसोबा पाणीवापर संस्थेतर्फे शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाते. या तलावामुळे सुमारे दोन हजार एकर क्षेत्रावर सिंचनाचा लाभ होतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.