इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने चांगली कामगिरी करत मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. या कसोटी मालिकेत शुभमन गिलने कसोटी कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आणि फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला.
या कसोटी मालिकेत गिलने सर्वाधिक 754 धावा केल्या आणि भारतीय कर्णधार म्हणून कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनल. पण असं असूनही त्याच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, कारण आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत तो पहिल्या 10 मधून बाहेर पडला. 30 जुलै रोजी आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर झाली तेव्हा गिल 9 व्या स्थानावर होता पण 6 ऑगस्ट रोजी नवीन क्रमवारी जाहीर झाली तेव्हा तो १३ व्या स्थानावर पोहोचला.
या चुकीमुळे गिलचं झालं नुकसान
आता प्रश्न असा आहे की, जेव्हा गिलने इंग्लंड दौऱ्यावर एकूण 754 धावा केल्या तेव्हा त्याच्या क्रमवारीत सुधारणा व्हायला हवी होती, परंतु तो तर 4 स्थानांनी घसरून 13 व्या स्थानावर पोहोचला. मग यामागील कारण काय ? खरंतर, भारताने इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना 31 जुलै रोजी खेळला, तो 4 ऑगस्ट रोजी संपला. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात गिलने फक्त 32 धावा केल्या आणि त्यामुळे त्याला क्रमवारीत नुकसान सहन करावे लागले.
6 ऑगस्ट रोजी नवीन क्रमवारी जाहीर झाली तेव्हा,5 व्या कसोटी सामन्यातील गिलची कामगिरी विचारात घेण्यात आली आणि त्यामुळे तो मागे पडला. त्याने फक्त 32 धावा केल्या असल्याने त्याचे रेटिंग गुण कमी झाले आणि त्याच्या क्रमवारीतही घसरण झाली. गिल ज्या फॉर्ममध्ये होता ते पाहता, जर त्याने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात मोठी धावसंख्या उभारली असती, तर त्याला त्याच्या क्रमवारीत फायदा झाला असता आणि तो कदाचित टॉप १० मधून बाहेर पडला नसता.