पहिल्यांदाच चोरीच्या गुन्ह्यात अटक! फिरायला जाण्यासाठी घेतलेले उसने पैसे परत देण्यासाठी दोघांनी आखला प्लॅन; रस्ता विचारण्याचा बहाणा करून हिसकावले महिलेचे गंठण
esakal August 09, 2025 08:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : सेटलमेंटकडे जाणारा रस्ता दाखविणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून पसार होणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आदित्य रमेश कोणदे (वय १९, रा. हत्तुरे वस्ती) व पृथ्वीराज श्रीशैल पुजारी (वय १९, रा. सैफुल) अशी त्या संशयितांची नावे आहेत.

सोलापूर शहरातील डोणगाव रोडवरील विष्णूमिल चाळीत राहणाऱ्या इंदूबाई तानाजी कांबळे या त्यांच्या भाच्यासोबत सोलापूरकडे येत होत्या. त्यावेळी भोजप्पा तांड्याकडे जाणाऱ्या रोडवर एका दुचाकीस्वाराने त्यांना थांबवून सेटलमेंटकडे जाणारा रस्ता विचारला. दुचाकीवरील मुलांना पाहून इंदूबाई या दुचाकीवरून खाली उतरल्या आणि हात करून रस्ता दाखवू लागल्या. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून मागे बसलेल्या तरुणाने इंदूबाई यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले आणि तेथून धूम ठोकली. पण, ते ज्या रस्त्याने शहरात आले, त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांचे चेहरे व दुचाकीचा क्रमांक टिपला गेला. पोलिसांनी तपास करताना रेकॉर्डवरील गुन्हेगारांपैकी कोणी आहे का? याची पडताळणी केली. बाहेरील जिल्ह्यातील कोणी आहे का, यादृष्टीनेही तपास केला, पण पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते.

दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी त्या दोन्ही मुलांचा शोध सुरू केला. चोरलेले दागिने दुसऱ्या दिवशी विकायला घराबाहेर पडले आणि होटगी रोडवरील साई लॉन्सजवळील मोकळ्या मैदानातून पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडील चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील, दत्तात्रय काळे यांच्या पथकाने पार पाडली.

उसने घेतलेले पैसे देण्यासाठी चोरी

नुकतीच इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेणारे आदित्य व पृथ्वीराज दोघे एकमेकांचे मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी ते बाहेर कोठेतरी फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्येकी १५ हजार रुपये हातउसने घेतले होते. समोरील व्यक्ती ते पैसे परत मागत होता, पण कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने या दोघांकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी प्लॅन करून निर्जनस्थळी उभारून भोजप्पा तांडा रोडवर एका महिलेच्या गळ्यातील गंठण चोरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.