मच्छिंद्र कदम ः सकाळ वृत्तसेवा
चिंचवड, ता. ९ ः आकुर्डी ते चिंचवडपर्यंतच्या सहापदरी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण झालेले असताना महापालिकेकडून हा रस्ता उखडून त्यावर झाडे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उद्यान विभागाच्या वृक्ष संवर्धन विभागाने झाडे लावली. मात्र, त्यामध्ये माती टाकण्याऐवजी डांबर आणि सिमेंटचा राडारोडा टाकला आहे. जवळपास २५ झाडांपैकी ८ ते १० झाडे पाण्याविना जळून गेली आहेत.
सुमारे दोन वर्षांपूर्वी महापालिकेमार्फत आकुर्डी ते चिंचवड मुख्य रस्त्याचे सहापदरी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, हा रस्ता उखडून त्यावर आता झाडे लावण्याचे काम सुरू आहे. त्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे. चिंचवड येथील एसकेएफ कंपनीपासून आकुर्डी चौकापर्यंत आधीच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना टाटा मोटर्स, एसकेएफ कंपन्यांच्या आजूबाजूला, सीमाभिंती, नाला आणि जवळच्या प्रेमलोक पार्क येथील उद्यानांत भरपूर वृक्ष लागवड केलेली आहेत. काही झाडे तर २५ ते ३० वर्षांपेक्षा जास्त जुनी असून आजही तग धरून आहेत. मग नव्याने डांबर फोडून खुरटी रोपे लावण्याचा अट्टाहास का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी स्थापत्य विभागाकडून त्यासाठी खड्डे खोदताना पाण्याची वाहिनी फुटून हजारो लिटर पाणी देखील वाया गेले. मात्र,
जवळपास एक महिना खड्डे काढल्यावर खोदलेल्या डांबरी रस्त्याचा राडारोडा, माती तशीच पडून आहे.
विनामाती रोपे टिकणार कशी ?
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, लावलेली झाडे मातीशिवाय, प्लास्टिक रॅपिंगसहित थेट डांबरातच बसवली आहेत. त्यामुळे ती मूळ धरतील कशी ? आणि जिवंत राहतील कशी ? असा बाळबोध प्रश्न निर्माण झाला आहे. कमी झाडे असलेल्या ठिकाणी वृक्षलागवड आवश्यक आहे. यावर कोणतेही दुमत नाही; मात्र सुस्थितीतल्या डांबरी रस्त्यावर खड्डे करून लागवड करणे हे अनाकलनीय आहे.
अनियोजित कामांची मालिका
चिंचवडमध्ये केवळ वृक्ष लागवडच नव्हे; तर इतरही अनेक कामांबाबत नागरिक शंका व्यक्त करत आहेत. सुस्थितीतले पदपथ तोडणे, अवाढव्य व नियोजनशून्य पदपथ उभारणे, पाण्याचा निचरा कसा होईल हे न पाहता रस्त्याची कामे रेटणे, जाणून बुजून देखभाल खर्च वाढवणारी कामे करणे, आडवे तिडवे बाके व संदर्भहीन सुशोभीकरण, अशा उदाहरणांची यादी वाढत आहे.
जबाबदारी निश्चित करणे कठीण
सध्या प्रशासकांच्या कारकिर्दीत महापालिकेची कामे होत असल्याने लोकप्रतिनिधींचे उत्तरदायित्व नाही. परिणामी, नागरिकांना या अनियंत्रित व खर्चिक कामांबद्दल एखाद्याला जबाबदार धरणे कठीण झाले आहे. अशा खर्चिक व निरुपयोगी कामांना विरोध करण्यासाठी समाजप्रबोधनाची जबाबदारी आता जनतेनेच उचलली पाहिजे, अशी भूमिका काही सुजाण नागरिक घेत आहेत. गरजेच्या ठिकाणी झाडे लावा; पण रस्त्याचे नुकसान करून नव्हे, असेही त्यांचे म्हणणे आहे.
जिथे झाडे नाहीत. तिथे रस्त्याच्या कडेला झाडे नक्की असावीत. जसे की महामार्ग, टेकड्या, उद्याने आणि औद्योगिक वसाहतीसारख्या अधिक प्रदूषण भागात झाडे लावायला हरकत नसावी. पण, डांबरी रस्त्यांवर खड्डे खणून झाडे लावणे अजब आहे. त्यामुळे नागरिकांना हा शंका निर्माण होणारा प्रकार वाटतो आहे.
- अनिल देवगांवकर, रहिवासी, चिंचवड
या सहापदरी रस्त्यावर अगोदरच कंपन्यांची झाडे भरपूर असताना विनाकारण वड, पिंपळाची झाडे लावलेली आहेत. एक महिन्यापासून कोणी पाणी घातले नाही. निम्मी झाडे वाळून गेलेली आहेत. खड्डे देखील एक महिन्यापासून बुजवलेले नाहीत. आम्हा नागरिकांना अपघाताचा धोका वाटत आहे.
- उत्तम चौरे, स्थानिक ज्येष्ठ नागरिक
महापालिका आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे जिथे मोकळी जागा असेल; तिथे झाडे लावण्यात येत आहेत. त्या पद्धतीने या ठिकाणी स्थापत्य विभागाला खड्डे खोदायला सांगितले होते. त्यानंतर, आम्ही त्या ठिकाणी झाडे लावलेली आहेत. पाऊस असल्यामुळे झाडे लावल्यानंतर पाणी दिले नव्हते. परंतु, सोमवारी पाण्याचा टँकर पाठवून तेथील झाडांना पाणी घातले जाईल. प्रत्यक्ष तिथे जाऊन काय झाले ते पाहण्यात येईल ?
- सिद्धेश्वर कडाळे, उद्यान सहाय्यक, वृक्ष संवर्धन विभाग
CWD25A01759