कामशेतमध्ये महावितरणची सुधारणा कामांना सुरुवात
esakal August 10, 2025 07:45 AM

तळेगाव दाभाडे, ता. ९ : कामशेतमधील सतत खंडित होणारा वीजपुरवठा, वाढीव बिलाचे आरोप आणि देयक दुरुस्तीसाठी वडगावला पाठविणे अशा विविध मागण्यांसाठी कामशेत येथील नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत आवाज उठवत १३ ऑगस्टला महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला होता. याबाबत सात ऑगस्टला ‘सकाळ’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन महावितरण अधिकाऱ्यांनी कामशेत येथे तातडीने बैठक घेऊन सुधारणा कामांना सुरुवात केली आहे.
शहरात पन्नास वर्षांपूर्वीचे खांब आणि वायरिंग वापरले जात असून ते जुने झाले आहेत. त्यामुळे दोन्ही बदलणे आवश्यक आहे. विजेच्या लपंडावामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे अशा विविध मागण्यांसाठी वीज ग्राहक संघटनेच्या वतीने बैठक घेऊन १३ ऑगस्टला महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा ठराव एकमताने करण्यात आला होता.

अधिकाऱ्यांची बैठक, कामांना सुरुवात
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राहुल परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कामशेत येथे बैठक झाली. यावेळी कामगार नेते भरत मोरे, सरपंच रूपेश गायकवाड, महेश शेट्टी, तानाजी दाभाडे, अभिमन्यू शिंदे, विलास भटेवरा, निलेश दाभाडे, सुभाष रायसोनी आदी उपस्थित होते. यावेळी वीज समस्येबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्याने बैठकीत अभिनंदन केले. दरम्यान, विविध कामांबाबत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

‘‘शहरातील जुने वितरण बॉक्स व तारा बदलण्याचे काम पूर्ण झाले असून, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खांबाच्या लोंबकळलेल्या तारा काढून लवकरात लवकर अंडर ग्राउंड टाकण्यात येणार आहेत. तसेच चिखलसे येथे जागेची उपलब्धता झाल्यानंतर लगेच सबस्टेशनचे काम सुरू करण्यात येईल.
- राहुल परदेशी, उपकार्यकारी अभियंता

‘‘कामशेत शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून, धरणे, नदी असूनही सतत होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. जोपर्यंत पाणी पुरवठ्यासाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित केले जाणार नाही.
- भरत मोरे, वीज ग्राहक संघटनेचे प्रमुख

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.