शरद पवारजी तुम्ही पुन्हा अर्धसत्य सांगून.., वंचित बहुजन आघाडीचे पवारांना 5 प्रश्न
Tv9 Marathi August 10, 2025 07:45 AM

लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र विधानसभा निवडणुकीत हे यश त्यांना टिकवता आलं नाही, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. महायुतीचे राज्यात तब्बल 232 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं. दरम्यान त्यानंतर सातत्यानं महाविकास आघाडीकडून ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आरोप सुरू आहेत.

त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोक माझ्याकडे आले होते,  ते मला 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते’ असा दावा पवार यांनी केला आहे, दरम्यान शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात वातावरण तापलं आहे, यावरून आता वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत शरद पवार यांना काही प्रश्न विचारले आहेत.

ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं? 

‘शरद पवार जी तुम्ही पुन्हा अर्धसत्य सांगून निघून गेलात! दोन लोकं तुम्हाला भेटली, ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करण्याची ऑफर दिली आणि सांगितले की, ते तुम्हाला १६० विधानसभेच्या जागा जिंकून देतील. तुम्ही म्हणत आहात की, तुम्हाला त्यांची नावे माहित नाहीत. तर ही गोष्ट सांगा की, 

१. तुम्ही पोलिसांकडे किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? तुम्ही या दोघांविरुद्ध तक्रार केली नाही पण, तुम्ही त्यांना राहुल गांधींकडे निवडणूक हेराफेरीचा सौदा करण्यासाठी घेऊन गेलात.

२. जर तुम्हाला त्या दोघांची नावं आणि पत्ता माहीत नसेल, तर जेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या घरात प्रवेश हा त्यांची नावे न लिहिताच झाला असेल! त्यांची नावे प्रवेश करतांना नोंदणीतून उघड होऊ शकतात.

३. तुमचे हेतू स्पष्ट नव्हते, म्हणूनच तुम्ही त्यांना राहुल गांधींकडे घेऊन गेलात. तुम्हाला माहित होते की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी होऊ शकते. मग तुम्ही गप्प का होता? कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही इतके दिवस गप्प राहिलात?

४. राहुल गांधींनी तुम्ही ज्या गोष्टी सांगत आहात याची पुष्टी करावी.

५. राहुल गांधी वरील सर्व प्रश्नांची पुष्टी करतील का? ‘

.@PawarSpeaks जी, तुम्ही पुन्हा अर्धसत्य सांगून निघून गेलात!

दोन लोकं तुम्हाला भेटली, ज्यांनी तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करण्याची ऑफर दिली आणि सांगितले की, ते तुम्हाला १६० विधानसभेच्या जागा जिंकून देतील. तुम्ही म्हणत आहात की, तुम्हाला त्यांची नावे माहित… pic.twitter.com/SP5fYs8VWD

— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia)

असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शरद पवार यांना ट्विटच्या माध्यमातून करण्यात आला आहे, दुसरीकडे भाजपने देखील यावरून पवारांवर निशाणा साधला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.