कोथरूड : सततची वाहतूक कोंडी ही पुणेकरांसाठी काही नवीन नाही. वर्षानुवर्षे पुणेकर ही दुरवस्था सहन करत आले आहेत. मात्र या कोंडीतून रुग्णवाहिकेला वाट मिळू शकत नसेल, तर मन हळहळल्याशिवाय राहत नाही. शुक्रवारी कोथरूडच्या पौड रस्त्यावरही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
सध्या सगळीकडेच गणेशोत्सव मंडळांकडून मंडप टाकण्याचे काम सुरू आहे. उत्सवाचा महिना असल्यामुळे विविध विक्रेत्यांचे रस्ता व पदपथावर अधिकृत व अनधिकृत स्टॉल लागलेले आहेत. वाहनांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने जिथे जागा मिळेल तिथे वाहने पार्क केली जात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आधीच अरुंद असलेले रस्ते अधिक अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
नागरिकांनी भान राखून रस्ता अडवला जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच वाहतूक पोलिस, महापालिका व गणेश मंडळांनी उत्सवाच्या काळात रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील, रस्ता अडवला जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी स्वयंसेवक नेमण्याची गरज आहे.
याबाबत प्रसाद भिडे म्हणाले की, शुक्रवारी सकाळी ऑफिसला जाताना आयडियल कॉलनी येथील मेट्रो स्थानक ते पौड फाटा चौक या रस्त्यावर एक रुग्णवाहिका रोजच्या कोंडीत बराच वेळ अडकून पडली होत, परंतु तिला वाट मिळू शकली नाही. काही वेळाने रुग्णाला घेऊन जाणारे नातेवाईकही अस्वस्थ झाले होते. त्यांच्या जिवाची घालमेल पाहून आम्हालाही चिंता वाटली. किमान आपत्कालीन प्रसंगात रुग्णवाहिकांना वाट करून देण्याची काही व्यवस्था व्हायला हवी.