>> वृषाली रावळे
सारं काही आनंदात असताना पतीचे अकाली अपघाती निधन झाले अन् दुःखाचा डोंगर कोसळला. कर्ता पुरुष नसल्याने शेतीची सर्व जबाबदारी सांभाळताना रडत बसण्यापेक्षा लढणे तिने पसंत केले. त्यामुळेच संकटांशी भिडत आज जिद्दीने द्राक्ष, भाजीपाल्याच्या प्रयोगशील शेतीत ‘ती’ उभी राहिली आहे. ही संघर्ष कहाणी आहे, नाशिक जिह्यातील मातोरी येथील संगीता अनिल पिंगळे यांची. एकटी महिला शेती करू शकत नाही, हा समज त्यांनी खोडून काढला आहे.
शेतकरी कुटुंबातील संगीता अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी 2000 साली विज्ञान शाखेत ‘रसायनशास्त्र’ या विषयात पदवी पूर्ण केली. स्पर्धा परीक्षा द्यायच्या आणि अधिकारी व्हायचं, असे त्यांचे स्वप्न होते. परंतु माहेरी शेतीकामे सोडाच पण शेतात जाण्याचीसुद्धा सवय नसणाऱया संगीता अनिल पिंगळे यांच्याशी विवाहबद्ध होऊन शेतकरी कुटुंबाशी कायमच्या जोडल्या गेल्या.
संगीता यांना दोन अपत्ये झाली. मात्र जन्मतच अपंग असणारा मुलगा पाच वर्षांचा असताना मृत पावला. अशातच 2007 साली गरोदरपणातच पती अनिल यांचे अपघाती निधन झाले आणि संगीतावर आभाळ कोसळलं. पती गेल्यानंतर 15 दिवसांनी मुलगा झाला. या धक्क्यातून सावरणे खूप कठीण होते. संगीता पतीच्या निधनानंतर नऊ वर्षे एकत्र कुटुंबात राहिल्या. कुटुंब विभक्त झाल्यानंतर वाटय़ाला 13 एकर शेती आली. त्या वेळी सासरे रामदास खंडू पिंगळे व सासू अनुसया यांनी भक्कम आधार दिला. दुःख पचवून अनुभव नसताना सासरे यांनी प्रोत्साहन दिल्याने त्या शेतीकामाला लागल्या. मात्र पुढे तीन महिन्यांतच सासऱयांचेही निधन झाले. सासू आणि दोन मुलांच्या सोबतीने ती संकटाशी भिडत राहिली. काळ परीक्षेचा असतानाही जगण्याचा नवा अध्याय सुरू केला.
संगीता यांनी शेतात काम करायला सुरूवात केली. त्यावेळी घरातील महिला शेती पाहणार, ही भूमिका काहींना पटत नव्हती, पण शेती पुन्हा फुलवून दाखवायची असा संकल्पच केला. मावसभाऊ, तज्ञ यांचा सल्ला घेऊन त्या शेतीत उतरल्या. द्राक्ष हे मुख्य नगदी पीक होते. मात्र त्यासाठी भांडवल नव्हते. त्या वेळी घराबाहेर पडण्यासाठी अडचण व्हायची. त्या वेळी दागिने गहाण ठेवून पहिली एक स्कूटर खरेदी केली. शेती नावावर. मात्र मुलगा लहान असल्याने शेतीसाठी कुठलेही कर्ज मिळत नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नातेवाईकांकडून भांडवलाची जुळवाजुळव करून टॉमॅटो लागवड केली. दर्जेदार माल तयार झाल्याने त्या वेळी आलेल्या उत्पन्नातून द्राक्ष शेतीसाठी भांडवल उभे केले. त्यानंतर संवेदनशील पिकांत काम करताना दिवस-रात्र संघर्ष करण्याची तयारी ठेवली.
एकीकडे भांडवल, दुसरीकडे अस्थिर वीज पुरवठा, कीडरोगांचा प्रादुर्भाव व अस्थिर बाजारपेठ अशी अनेक आव्हाने होती. कुटुंब विभक्त झाल्यावर सात एकर थॉम्सन व दोन एकर जम्बो काळा वाण होता. सुरुवातीला अनुभव नसल्याने द्राक्ष शेतीचे वार्षिक कामकाज समजून घेतले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये बहर छाटणी, सिंचन व्यवस्थापन, शेती यंत्रांची दुरुस्ती, मजूर व्यवस्थापन व शेतमाल विक्री अशी कामे अनुभव नसताना त्या करू लागल्या. मावसभावाच्या मार्गदर्शनाने पहिल्या वर्षी 1,200 क्विंटल द्राक्ष उत्पादन हाती आल्याने आत्मविश्वास वाढला. त्यातूनच पहिल्याच वर्षात घेतलेली आर्थिक मदत परत केली. एवढेच काय, तर पुरुषांप्रमाणे निविष्ठा, इंधन खरेदी, किराणा असो वा मुलांचे शिक्षण, तर कधी आजारपण ही सर्व जबाबदारी त्या पाहतात. एकटी महिला शेती करू शकत नाही, हा समज संगीता पिंगळे यांनी भावना खोडून काढला.
कामात सुसूत्रता आणली
पावसाळ्यात शेतीत पाणी साचून राहिल्याने लवकर वाफसा होत नाही. त्यामुळे द्राक्षबागेत ट्रक्टरचलित फवारणी यंत्र वापरता येत नसल्याने फवारणी करण्याची वेळ त्यांच्यावर यायची. एकीकडे शेती, तर दुसरीकडे कुटुंबाची जबाबदारी सांभाळून कामात सुसूत्रता आणली. सासू अनुसयाबाई यांचा भक्कम आधार राहिला. माहेरी वाहन चालविण्याचा अनुभव होता. त्यामुळे औषध फवारणी, शेतमाल वाहतूक ही कामेही त्यांनी केली. कृषी निविष्ठा खरेदी, हंगाम नियोजन, मजूर व्यवस्थापन, छाटणी ते काढणी अशी सर्व कामे त्या पाहतात. कार्यक्षमता वाढीसाठी अत्याधुनिक यांत्रिकीकरण, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याकडे त्यांचा कल असतो.
स्वतला सावरत आदर्श वाटचाल
पती गेल्यानंतर संगीता यांनी दुःख लपवत घर सांभाळले. मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवित त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष त्या देतात. स्वतला सावरून शेतीत लक्ष घालीत आदर्श महिला शेतकरी होण्यासाठी त्यांची अविरत मेहनत सुरू असते. त्यांच्या संघर्षमय कार्याची दखल घेत सह्याद्री फार्मर्स प्रोडय़ुसर कंपनीकडून ‘नवदुर्गा सन्मान’, ‘कृषीथॉन प्रयोगशील महिला शेतकरी सन्मान’, जेसीआयच्या वतीने ‘महिला शेतकरी सन्मान’ त्यांना मिळाला आहे.
समस्या आल्या तरी संकटात मार्ग शोधता येतो हे संगीता यांनी दर्शविले. नियोजनाला व्यवस्थापनाची जोड देत ही दिशा ठेवून पुढे वाटचाल केली. त्यामुळे आज पुन्हा उभी राहिले. कष्ट या शब्दाशी महिलेचं आयुष्य बांधलं असावं की काय अशी संगीता यांची गाथा. परंतु मातीतून सोनं पिकवण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, मेहनतीने त्यांना आज वेगळी ओळख मिळवून दिली आहे. पिकपाण्याचा अखंड राबता देणार्या संगीता या खर्या अन्नपूर्णा आहेत.
गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे कल
शेती हा एका अर्थाने उत्पादन व्यवसाय. त्यामुळेच इतर व्यवसायाचे समीकरण शेतीलाही लागू पडते. हे सारं आजमावलेल्या संगीता याबाबत सांगतात, ‘द्राक्षाच्या एकूण उत्पादनापैकी 60 टक्के निर्यात, तर 40 टक्के देशांतर्गत विक्री असे उत्पादन व विक्रीचे सूत्र आहे. त्यामुळेच छाटणी झाल्यानंतर माल धरताना उत्पादन वाढविण्यापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी पीक व्यवस्थापन, हंगामी कामे वेळेवर झाली पाहिजेत हा आग्रह असतो. गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनात सातत्य राखण्याचे हेच गमक आहे. त्यामुळे दरही चांगले मिळतात आणि उत्पन्नवाढीसाठी मदत होते.’