‘तारिणी’ मालिकेमधून अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदा ॲक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. तो मालिकेत केदारची भूमिका साकारत आहे जो एक अंडरकव्हर पोलीस आहे. त्याला समाजामध्ये वाढणारी गुन्हेगारी कमी करायची आहे आणि आपल्या बाबांना शोधायचं आहे. स्वराजने पहिल्या प्रोमोशूटपासून ते शूटिंगपर्यंतचे किस्से सांगितले आहेत. “मी आयुष्यात पहिल्यांदा ॲक्शन सीन केला आहे आणि पहिल्यांदाच गनफायर केली. मला माहीत नव्हतं की गनफायर करताना इतका मोठ्या प्रमाणात आवाज होतो. मी आणि शिवानीने जशी गनफायर केली तसं आम्ही दोघंही 10-15 सेकंदांसाठी सुन्न झालो. आमच्या कानठळ्या बसल्या आणि आम्ही दोघंही हसायला लागलो,” असं तो म्हणाला.
याविषयी त्याने पुढे सांगितलं, “तो पहिला प्रोमो शूट करण्याचा अनुभव आणि त्यात पहिल्यांदा ॲक्शन आणि गनफायर करणं हा खूप छान अनुभव होता. तारिणी मालिकेचे जे कास्टिंग डायरेक्टर आहेत, विश्वास नवरे.. त्यांचा मला ऑडिशनसाठी फोन आला होता. पण एका दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे मला ऑडिशनला जाणं शक्य नव्हतं. असं जवळपास दोनदा झालं होतं. पण मग मी त्यांना विनंती केली की घरून व्हिडीओ बनवून ऑडिशन पाठवली तर चालेल का?”
पोलीस अधिकाऱ्याची भूमिका असल्याने स्वराजने त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष दिलं. “जेव्हा सिलेक्शनचा कॉल आला, तेव्हा माझी लूकटेस्ट सुरू होती आणि मला परत ऑडिशन द्यायची होती. लूकटेस्टनंतर ऑडिशनसाठी तयारी करत होतो, तेवढ्यात झी मराठीमधून शर्मिष्ठा मॅमना कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की स्वराज भूमिकेसाठी लॉक झालाय. मला कळलंच नाही की मी कशी प्रतिक्रिया देऊ. सगळ्यात आधी आई-बाबांना सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला आणि माझी खूप जवळची मैत्रीण आहे तिलाही कॉल करून सांगितलं. मला इथे सांगावंसं वाटतं की माझे बाबा माझ्यासाठी खूप लकी आहेत. ते आधीच बोलले होते की तुझंच सिलेक्शन होणार. तू काळजी करू नकोस आणि तसंच झालं,” अशा शब्दांत स्वराजने भावना व्यक्त केल्या.
यावेळी त्याने प्रोमो शूटिंगचा भन्नाट किस्साही सांगितला. “गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी प्रोमो प्रदर्शित झाला आणि लोकांना तो खूप आवडला. मला माझ्या परिवार आणि मित्रांकडून खूप कॉल्स आले आणि 24 तासांत प्रोमोला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कमेंट्समध्ये लोकांचा उत्साह कळत होता. सेटवर माझी शिवानीबरोबर मैत्री झालीच आहे. माझ्या भूमिकेचं नाव केदार आहे आणि तो एकटाच राहतो. त्याला आई नाहीये, बाबा आहेत. पण बाबा कोण आहे हे त्याला माहिती नाही. तो त्यांच्या शोधात आहे, कारण ते त्याला आणि त्याचा आईला लहान असतानाच सोडून जातात. त्यासोबत त्याचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे समजातील वाढती गुन्हेगारी कमी करायची आहे. खूप रंजक विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ज्यामध्ये त्यांना फॅमिली ड्रामा आणि ॲक्शन असं एकत्र बघयला मिळणार आहे,” असं तो पुढे म्हणाला.