आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात एआय चुटकीसरशी मानवाचे प्रश्न सोडवत आहे. त्यामुळे अनेक नोकऱ्यांवर गदा आली आहे. एआय मानवी जीवनात झपाट्याने हस्तक्षेप करताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात काय मांडलं आहे याची चिंता आतापासून भासू लागली आहे. असं असताना एआयबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. एआयच्या माध्यमातून उपचार किंवा वैद्यकिय सल्ला घेणे महागात पडू शकते. यामुळे तज्ज्ञांनी याबाबत आधीच इशारा दिला आहे. कारण आर्टिफिशियल इंटेलिजेंस इतकंही विकसित झालं नाही की डॉक्टरांची जागा घेऊ शकेल. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस डॉक्टरांची जागा घेईल. पण यावर अवलंबून राहणं महागात पडू शकतं. त्याचं ताजं उदाहरण न्यूयॉर्कमधून समोर आलं आहे. एका 60 वर्षीय व्यक्तीने चॅट जीपीटीचं ऐकलं आणि तीन आठवड्यांसाठी रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. आता डॉक्टरांकडून योग्य उपचार घेऊन घरी परतला आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आरोग्य आणि पोषणाशी संबंधित बाबींमध्ये एआयचा सल्ला घेणे धोकादायक ठरू शकते.
नेमकी काय चूक झाली?टाइम्स इंडियाच्या वृत्तानुसार, सदर व्यक्तीने चॅटजीपीटीला विचारलं की, जेवणातील मीठ कसं काढायचं? त्यावर एआयने सल्ला दिला की, मीठाच्या जागी सोडियम ब्रोमाइडचा वापर करा. याचा वापर 20व्या शतकाच्या सुरुवातीला काही औषधांमध्ये होत होता. पण याची अधिकची मात्रा घातक मानली जात होती. पण त्या व्यक्तीने एआयवर विश्वास टाकला आणि ऑनलाइन सोडियम ब्रोमाइड विकत घेतलं. तीन महिने त्याने मीठाऐवजी त्याचा वापर केला. पण डॉक्टरांचा सल्ला काही घेतला नाही. त्यामुळे त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला.
सदर व्यक्तीला सोडियम ब्रोमाइडच्या सेवनामुळे गंभीर परिणाम जाणवू लागले. त्याला भिती वाटू लागली, भ्रम, तहान लागणे आणि मानसिक गोंधळ अशा समस्या भेडसावू लागल्या. त्याची प्रकृती इतकी खालावली की त्याने पाणी पिण्यासही नकार दिला. पाण्यात काही मिसळल्याची भीती त्याला वाटू लागली. अशा स्थितीतच त्याला रुग्णालयाच दाखल केलं. डॉक्टरांच्या तपासणीत सोडियम ब्रोमाइडच्या वापरामुळे परिणाम झाल्याचं दिसून आलं. तीन आठवडे डॉक्टरांनी उपचार केले आणि शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइटचं संतुलन केलं. त्यानंतर त्याला बरं वाटलं आणि डिस्चार्ज देण्यात आला.