आजोबांना ऑनलाईन मैत्री करण्याची हौस, 4 महिलांनी केला भयंकर कांड!
Tv9 Marathi August 11, 2025 07:45 AM

Crime News : भारतात रोज वेगवेगळ्या पद्धतीचे अचंबित करणारे सायबर क्राईमचे गुन्हे समोर येतात. अनेकदा महिला समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैसे उकळतात. तर कधी-कधी आपण बँकेचे अधिकारी असल्याचे दाखवून नागरिकांना लाखो रुपयांना लुटले जाते. सध्या मात्र एक अजब प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका 80 वर्षीय आजोबांची चक्क 8.7 कोटी रुपयांना लूट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एक-दोन नव्हे तर तब्बल चार महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीने या आजोबांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून हे पैसे उकळले आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार एकूण चार वेगवेगळ्या महिलांनी मुंबईतील एका 80 वर्षीय वृद्ध आजोबांना तब्बल 8.7 कोटींना लुटले आहे. या ब्लॅकमेलिंगला एप्रिल 2023 मध्ये सुरूवात झाली. सुरुवातीला या आजोबांनी शार्वी नावाच्या एका महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. अगोदर या महिलेने आजोबांची फ्रेंड रिक्वेस्ट नाकारली होती. नंतर मात्र तिने स्वत:च फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आजोबांसोबत मैत्री केली. नंतर आजोबा आणि शार्वी नावाची महिला यांच्यातील मैत्री जास्तच घट्ट होत गेली. दोघेही व्हॉट्सअॅपवर बोलू लागले. दोघांमध्येही मैत्री वाढल्यानंतर शार्वीने मी खूप अडचणीत आहे. माझा घटस्फोट झालेला आहे. मला दोन मुलं आहेत, असं ती आजोबांना सांगायची. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ती आजोबांकडे वेळोवेळी पैसे मागायची. आजोबाही तिच्या जाळ्यात फसले. ते तिला सतत पैसे पाठवत राहिले.

आजोबांना कशा पद्धतीने लुटलं

नंतर या आजोबांच्या संपर्कात कविता नावाची एक महिला आली. अगोदर या महिलेने आजोबांना अश्लील मेसेज पाठवले. त्यानंतर ती आजोबांना ब्लॅकमेल करून माझ्या मुलांच्या उपचारासाठी पैसे पाठवा, असे सांगायला लागली. आजोबांनी कविता नावाच्या या महिलेलाही पैसे पाठवले. त्यानंतर या आजोबांच्या संपर्कात दीनाज नावाची आणखी एक महिला आली. मी कविताची शार्वीची बहीण असून तिचा मृत्यू झाला आहे. तिच्यावरील उपचाराची फी भरायची आहे, असे सांगून यादेखील महिलेने 80 वर्षांच्या आजोबांकडू पैसे उकळले. हे पैसे आजोबांनी परत मागितल्यावर त्या महिलेले त्यांना आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर जॅस्मीन नावाच्या महिलेनेही मी दीनाजची मैत्रिण असल्याचे सांगितले आणि आजोबांकडून पैसे उकळले.

आजोबांना बसला धक्का…

दरम्यान, या चारही महिलांनी आजोबांकडून एकूण 8.7 कोटी रुपये उकळल्याचे समोर आले आहे. हा प्रकार आजोबांच्या मुलांना समजल्यावर थेट पोलिसात तक्रार दिली. तसेच 8.7 कोटी रुपयांची लूट झाल्याचे समजल्यावर वृद्ध आजोबांना धक्का बसला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर पोलिसांनीही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.