आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर आरसीबीचं गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. जे कोणाला जमलं नाही ते कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वात शक्य झालं. त्यामुळे रजत पाटीदार आरसीबी संघासाठी लकी ठरला असं म्हणायला हरकत नाही. असं असताना आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारसोबत एक मोठा स्कॅम झाला आहे. त्याच्या फोन नंबरवरून टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स यांची फसवणूक केली आहे. हे दोघंही ज्याला कॉल करत होते तो त्यांचा चाहता निघाला. ही बातमी जेव्हा रजत पाटीदारला कळली तेव्हा त्याने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि सदर व्यक्तीची विचारपूस केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्या चाहत्याने सांगितलं की, विराट कोहलीशी बोलण्याचं स्वप्न पूर्ण झाले. छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात राहणाऱ्या मुलाला आरसीबीच्या अनेक दिग्गज खेळाडूंचे फोन आले. असं कसं झालं ते समजून घेऊयात.
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याचा जुना नंबर 90 दिवसांपेक्षा अधिक काळ सक्रिय नव्हता. या नंबरवर रिचार्ज नसल्याने टेलिकॉम प्रोव्हायडरने हा नंबर निष्क्रिय केला. तसेच छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात राहणाऱ्या मनिषला दिला. मनिषने जूनच्या शेवटच्या आठवड्यात रिलायन्स जिओचे सिमकार्ड सक्रिय केले. जेव्हा मनिषने व्हॉट्सएपवर लॉगिन केले तेव्हा त्याला प्रोफाईल इमेजवर रजत पाटीदारचा फोटो दिसला. त्याने मित्र खेमराजला याबाद्दल माहिती दिली. यानंतर मनिषला काही दिवसातच मोठमोठ्या क्रिकेटपटूंचे फोन येऊ लागले. या कालावधीत विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनीही फोन आहे. त्यामुळे मनिषला ही गंमत वाटली. पण खुद्द रजत पाटीदारने त्याच्याशी संपर्क साधल आणि जुना नंबर मागितला तेव्हा सत्य समोर आलं.
रजत पाटीदारने मनिषला त्या फोन नंबरचे महत्त्व सांगितले. कारण त्याचा नंबर त्याच्या प्रशिक्षकांकडे, संघातील सहकाऱ्यांकडे आणि जवळच्या लोकांकडे होता. पण मनिषने रजतला स्पष्ट नकार दिला. कारण त्याला त्याच्यावर विश्वासच नव्हता. पाटिदारने यानंतर पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर पोलीस दहा मिनिटातच मनिषच्या घरी पोहोचले. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर मनीष आणि खेमराजने रजत पाटीदारला सिम कार्ड परत केले. मनिषचा मित्र खेमराजने यावेळी एक गोष्ट सांगितलं की, चुकीच्या नंबरमुळे मला कोहलीशी बोलण्याची संधी मिळाली आणि आयुष्यातील स्वप्न पूर्ण झालं.