महडमध्ये आज भाविकांचा मेळा
अंगारकीनिमित्त वरदविनायकाचे दर्शन
खोपोली, ता.११ (बातमीदार)ः अष्टविनायक क्षेत्रांपैकी एक असलेल्या महडमध्ये श्रावणातील अंगारकी चतुर्थीनिमित्त हजारो भाविक वरदविनायकाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी गणपती संस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ , व्यवस्थापन समितीसह खालापूर पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
अंगारकी निमित्ताने हजारोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने वाहतूक नियोजन, वाहनपार्किंगसह भक्तांना दर्शन मिळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सभामंडपात भव्य रांगोळी फुलांची आरास आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. तसेच महामार्गापासून देवस्थानापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
-----------------------------------
विशेष पथक तैनात
महड अष्टविनायक क्षेत्र विश्वस्त मंडळाच्या कार्यवाह अॅड. मोहिनी वैद्य, खालापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी विशेष पोलिस पथक नियुक्त केले आहे. तसेच स्थानिक गावकरी, सामाजिक कार्यकर्तेही मदत करणार आहेत.