'तारक मेहता..'च्या बबिताला काय झालं? 10 दिवसांपासून रुग्णालयात ये-जा, भावूक होत म्हणाली..
Tv9 Marathi August 12, 2025 03:45 PM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत बबिताजीची भूमिका साकारून अभिनेत्री मुनमुन दत्ता घराघरात पोहोचली. मालिकेतील जेठालाल आणि बबिताजी यांच्यातील मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांनाच खूप आवडते. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुनमुन मालिकेत दिसत नसून सोशल मीडियावरही ती फारशी सक्रिय नाही. एरव्ही इन्स्टाग्रामवर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करणाऱ्या मुनमुनने बऱ्याच दिवसांपासून काहीच पोस्ट केलं नाही. त्यामुळे चाहत्यांनी तिच्याविषयी काळजी व्यक्त केली होती. अखेर त्यामागचं कारण खुद्द मुनमुननेच सांगितलं आहे. मालिका आणि सोशल मीडियापासून दूर राहण्यामागचं कारण तिने नुकत्याच एका पोस्टद्वारे सांगितलं आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुनमुननेस्वत:चा एक सेल्फी पोस्ट केला आहे. त्याचसोबत तिने तिच्या आईची प्रकृती ठीक नसल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ‘हो, मी बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर सक्रिय नव्हते. माझ्या आईची प्रकृती ठीक नाही. गेल्या दहा दिवसांपासून मी रुग्णालयाच्या फेऱ्या मारतेय. सध्या तिची प्रकृती हळूहळू सुधारतेय आणि लवकरच ती पूर्णपणे बरी होईल अशी अपेक्षा करते. व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल राखणं खूप तणावाचं झालं आहे. यात मी खूप थकलेय, परंतु या कठीण काळात ज्या मित्रमैत्रिणींनी माझी मदत केली, त्यांची मी आभारी आहे. देवाची कृपा’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता..’ मालिकेतून जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि बबिताजींची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता गायब असल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. या दोघांनी मालिका सोडली की काय, असे प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारले जात होते. परंतु या दोघांनी वैयक्तिक कारणांसाठी रजा घेतल्याचं निर्माते असितकुमार मोदी यांनी स्पष्ट केलं होतं.

‘तारक मेहता..’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. अभिनेत्री मुनमुन दत्ता सुरुवातीपासून या मालिकेत काम करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.