मुठीत धरुन ठेवलेला खडा गळून खाली पडल्यावर तो जागा झाला. चोर लोक नेहमी असेच करतात. झोपताना हातात दगड (किंवा हल्ली मोबाइल फोन) घेऊन झोपतात. पहाटेच्या सुमारास दगड (किंवा फोन) गळून पडला की याचा अर्थ सारे जग झोपी गेले आहे, असे समजायचे. चोराने चटकन उठून शेजारच्या जोडीदारास उठवले. त्या गधड्याच्या हातात मोबाइल अजून तसाच होता! दोघेही उठले, आणि गुप्त मोहिमेवर निघाले…
बरीच वेषांतरे ट्राय केल्यावर त्यांनी एक सामान्य पोशाख निवडला. गर्दीत मिसळून जायला मळखाऊ पोशाख नेहमी बरा! एक सामान्य चेहरा निवडून त्यांनी टिपिकल सामान्य मेकप केला. दोनदा बघून त्यांच्या पत्नीनेही वळून पाहिले नसते, अशा व्यक्ती बनून ते दोघे एका थोर पक्षाच्या थोर नेत्याकडे आले. नेताजी चहा पीत होते. त्यांनी विचारले, ‘काय काम काढलं?’
‘आम्ही तुमच्या पक्षाला १६० जागा जिंकून देऊ शकतो. एकशे एकुणसाठ नाही, नि एकशे एकसष्ट नाही! डील?’ दोघांपैकी एकाने अत्यंत सामान्य आवाजात ऑफर दिली. थोर नेत्याने मिनिटभर त्यांच्याकडे बघून विचारले, ‘काय घेणार?’
‘ते ठरवू…पण-’ दोघांपैकी एकाने वाटाघाटींना सुरवात केली.
‘चहा की कॉफी?’ थोर नेत्याने खुलासा केला. ‘चहा चालेल, डबल शक्कर’ हे शब्द उच्चारण्याआधीच थोर नेता म्हणाला, ‘मी एक चिठ्ठी देतो, त्यांना जाऊन भेटा, बघा काही जमतंय का!’
आपल्याला फुटवण्यात आले आहे, हे दोघांनाही कळले. तरीही ते चिठ्ठी घेऊन संबंधिताकडे गेले. तो दुसऱ्याच पक्षाचा अतिथोर नेता होता…
‘कहिए, क्या चाहते हो?’ त्या अतिथोर नेत्याने अतिशय मुहब्बतीने विचारले. त्याचा मुहब्बतीचा मोठा व्यापार असल्याची माहिती चोरांनी काढलीच होती.
‘हम तुमकू एकशेसाठ जागा जिंकून देंगे, बोलो, डील करने का क्या?’ निवडणुकीतील मतदार-यादी इतकी शुद्ध हिंदी बोलत चोर म्हणाला. ते हिंदी ऐकून तो अतिथोर नेता हबकला, पण काही बोलला नाही.
‘वो चिंता आप मुझपर छोडो, मी ठरवलं तर एकटा तीन-साडेतीनशे जागा आणू शकतो, तुम्हाला किती हव्या आहेत, तेवढं सांगा!’ अतिथोर नेत्याचा दांडगा आत्मविश्वास बघून दोघे चोर उठलेच.
जरा मऊ, सभ्य, सज्जन नेता शोधून डाव टाकला पाहिजे हे ओळखून दोघेही मुंबईच्या एका उपनगरात आले. उपनगरातल्या एका बंगल्यात शिरकाव करुन घेतला. तिथे दारावर एक भोंगा होता. भोंग्याने मोठ्ठ्या आवाजात विचारलेल्या प्रश्नांना चोरांनी हळू आवाजात उत्तरे दिली.
‘आम्ही एकशेसाठ जागा जिंकून देतो. पाच वर्षाची ग्यारंटी! दोन वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटीसुध्दा भेटेल..,’ चोराने डील सांगितले.
‘साहेबांना विचारावं लागेल!’ भोंग्यातून आवाज दुमदुमला.
‘कुठे आहेत साहेब?’ चोर अर्थातच चोरट्या आवाजात.
‘साहेब असे कुणाला भेटत नसतात!’ भोंगा अर्थातच भों भों आवाजात.
इथे आपल्याला चहा, वडा..काहीही मिळणार नाही, हे ओळखून दोघेही चोर आल्यापावली परत फिरले. दादरला शिवाजी पार्कजवळच्या एका जबरी नेत्याकडेही जाऊन आले. त्यांची ऑफर ऐकून तो नेताच खोखो हसू लागला!! चोर निमूटपणाने तिथूनही उठले.
…अखेर जड पावलांनी आपल्या अड्ड्यावर परत आले. तिथे चोरांचा सरदार बसला होता. त्याने विचारले, ‘कितने आदमी थे…फिर भी वापस आये? खाली हाथ? आँ, तुम्हे क्या लगा, सरदार खुस होगा, सभासी देगा, आँ?’
…असे म्हणत सरदाराने खरेच त्यांना शाब्बाशी दिली, म्हणाला, ‘चला, चिंता मिटली, सगळे अजूनही झोपलेले आहेत तर..!’