आधाराचे खांदे
esakal August 12, 2025 03:45 PM

- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

कॅन्सरचे परिणाम फक्त रुग्णापुरतेच मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण घरावर होतात. घरातल्या एका व्यक्तीला कॅन्सर झाला, की सगळं घर त्यात गुरफटतं. घरातली सगळी रूटिन, सगळ्या सवयी, नॉर्मल जीवन एकदम बदलतं. हॉस्पिटलच्या चकरा, रिपोर्ट्स, औषधं, ट्रीटमेंट... हे सगळं एकत्र येतं.

पण या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरच्यांनी मन शांत ठेवणं. कारण पेशंटच्या मनात चाललेली घालमेल, भीती, ताण... यावर घरच्यांचा धीर फार मोठी ताकद असतो. पेशंटला वाटतं, ‘माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठाम उभं आहे, मग मी हे सगळं पार करू शकतो.’

मी खूप वेळा पाहिलंय, पेशंटचं हसतं-खिदळतं मन हे घरच्यांच्या चेहऱ्यावरच्या धीरानं टिकून राहतं. आतून काळजी असेल, तरी त्याच वेळी घरच्यांनी सकारात्मक राहणं गरजेचं असतं. कारण पेशंटला ताकद फक्त औषधांनी नाही, तर आपल्या लोकांच्या नजरेतल्या विश्वासानेही मिळते.

अनेक वेळा असं पाहण्यात येतं, की पेशंटपेक्षा जास्त तणाव घरच्यांच्या चेहऱ्यावर दिसतो; पण त्या तणावाला आपण हाताळलं पाहिजे. घरचं वातावरण जितकं हलकंफुलकं, तितका पेशंटवरचा मानसिक भार कमी होतो. थोडी मजा, थोडी गप्पा, थोडा हशा हे औषधांपेक्षा जास्त उपयोगी ठरतं.

कॅन्सरच्या प्रवासात डॉक्टर, औषधं, ट्रीटमेंट या सगळ्याइतकीच मोठी औषधं म्हणजे घरच्यांचा पाठिंबा. कॅन्सर फक्त पेशंटलाच होत नाही, तो सगळ्यांना स्पर्श करतो; पण त्यावर मात करणारी ताकदही घरच्या प्रत्येकामध्ये असते आणि जेव्हा ही ताकद पेशंटपर्यंत पोहोचते, तेव्हा हा प्रवास कठीण असला, तरी शेवट विजयाचा होतो.

घरच्यांचा आधार आणि पेशंटबरोबर स्वतःची काळजीही महत्त्वाची असते. कॅन्सर घरात येतो, तेव्हा फक्त पेशंटच नाही, तर सगळा परिवार त्यात सामील होतो. घरच्यांना हॉस्पिटलच्या राऊंडबरोबर पैशाची तजवीज ही करावी लागते. हे सर्व मॅनेज करण्याचा ताण घरच्यांवर असतोच; पण अशा परिस्थितीमध्ये आपलं मानसिक संतुलनसुद्धा महत्त्वाचं असतं. एक गोष्ट घरच्यांनी कायम लक्षात ठेवायला हवी, तुम्ही स्वतः ठीक असाल, तरच पेशंटला नीट सपोर्ट देऊ शकता.

बऱ्याच वेळा आपण पेशंटच्या काळजीत इतके बुडतो, की स्वतःकडे लक्षच राहत नाही. नीट जेवण होत नाही, झोप कमी होते, आपल्या तब्येतीची काळजी घेतली जात नाही. पेशंटला आनंदी ठेवायचं असेल तर आधी घरच्यांचं मन प्रसन्न असणं गरजेचं आहे. त्यासाठी: रोजच्या गडबडीत स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मित्रांशी किंवा नातेवाईकांशी बोलत राहा. जेवण, झोप आणि हलका व्यायाम याकडे लक्ष द्या.

घरच्यांचा मूड पेशंटवर थेट परिणाम करतो. तुम्ही हसतमुख असाल तर पेशंटही रिलॅक्स राहतो. घरात हलकंफुलकं वातावरण ठेवा. थोड्या गप्पा, थोडा हशा, जुन्या आठवणी, लहानसं सेलिब्रेशन... या छोट्या गोष्टी पेशंटच्या मनातला ताण कमी करतात.

पेशंटला धीर देताना एक गोष्ट विसरू नका, त्याला फक्त औषधांची नाही, तर ‘नॉर्मल लाइफ’ची जाणीव हवी असते. त्याला वाटावं, की आजार असूनही आयुष्य पुढे चालू आहे. म्हणूनच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला सहभागी करा. चहा पिण्याचा टाइम, घरातला लहानसा फंक्शन, एखादा चित्रपट... हे क्षण पेशंटच्या मनात जिवंत राहण्याची ऊर्जा वाढवतात.

घरातले असे छोटे-मोठे प्रसंग नॉर्मल आयुष्याची जाणीव करून देतात आणि कॅन्सर पेशंटला आणि तुम्हालाही नवचैतन्य देतात. ‘सर्व काही ठीक आहे’ ही जाणीवच आयुष्यात खूप बळ देऊन जाते. त्याच वेळी, पेशंटला उगाच नेहमी गंभीर न ठेवता त्याला आयुष्यातील छोट्या आनंदाची आठवण करून द्या. खिडकीत बसून पाऊस बघणं, आवडतं गाणं ऐकणं, आवडत्या डिशचा आस्वाद घेणं हे क्षण पेशंटच्या मनात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करतात.

सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःच्या मनावर ताण येऊ देऊ नका. तुम्ही संतुलित राहिलात तरच पेशंटचा आधार बनू शकता. ‘कॅन्सर हा आयुष्यातला एक अध्याय आहे, पूर्ण पुस्तक नाही. घरचं प्रेम, धीर आणि हसणं हेच पेशंटच्या प्रवासाचं सर्वात सुंदर पान बनतं.’ शेवटी एकच, घरच्यांनी पेशंटसाठी ताकद बनायचं असेल तर स्वतःची ताकद टिकवणं तितकंच महत्त्वाचं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.