85020
येई गणेशा - लोगो
प्रसादेंच्या चित्रशाळेस ११० वर्षांची परंपरा
संगमेश्वर तालुका ; केवळ शाडु मूर्तींची निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १८ ः गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला असताना सर्वच गणेश मूर्ती कारखान्यात मोठी लगबग सुरू असून मूर्तिकार गणेश चित्रांवर अखेरचा हात फिरवण्यात मग्न आहेत. संगमेश्वर मधील प्रसादे बंधूची चित्र शाळा पर्यावरणपुरक मूर्ती तयार करण्यासाठी प्रसिद्ध असून या चित्रशाळेला ११० वर्ष पूर्ण झाली आहेत.
संगमेश्वर बाजारपेठेत प्रसादे कुटुंबाचा गणेशमुर्तीचा कारखाना आहे. ११० वर्ष या कारखान्याला पूर्ण झाली आहेत. या गणेशचित्रशाळेत सुबक मूर्ती बनवल्या जातात आणि प्रसादे यांच्या पाच पिढ्या इथं गणेशमुर्ती घडवण्याचे काम करत आहेत. विठोबा प्रसादे यांनी ही गणेशचित्र शाळा सुरू केली होती. त्यानंतर आता प्रसादे कुटुंबातील भाऊ, त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं आणि पुतणे, पुतण्या देखील हा वारसा पुढे चालवत आहेत. अशोक प्रसादे, राजा प्रसादे, जितेंद्र प्रसादे यांच्यासोबत घरातील अनेक मंडळी गणपतीची मूर्ती घडवताना पहायला मिळतात. प्रसादे यांच्या घरातील मुलांनी देखील या गणेशचित्र शाळेत रस घेतला. उच्च शिक्षण घेतलेल्या प्रसादे कुटुंबातील सदस्य सुद्धा मूर्ती घडविण्याचे तसेच रंगविण्याचे काम आवडीनं करतात. स्वरा प्रसादे तर गणपतीची रेखणी म्हणजे डोळे काढण्याचे अवघड काम लीलया करत आहेत. शाडू मातीच्या देखण्या आणि रेखीव गणेशमूर्ती प्रसादे यांच्या चित्रशाळेतून अनेक गणेशभक्त घेऊन जातात. सध्या सर्वत्र प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पेण येथून आणून केवळ रंगकाम करीत भक्तगणांना दिल्या जातात. अशा स्थितीत प्रसादे हे, एकही प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विकत नाहीत.
कोट
आमच्या गणेश चित्र शाळेला शतकोत्तर परंपरा आहे. गणेश भक्त आमच्या गणेश चित्र शाळेत मोठ्या विश्वासाने गणेश मूर्ती घेण्यासाठी येत असतात. या भक्तगणांना त्यांच्या आवडीनुसार सुबकमूर्ती देणे आणि ती पर्यावरणपूरक असणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. ज्या मूर्तींचे विसर्जना नंतर पाण्यात विघटन होत नाही, अशा मूर्ती आम्ही कधीही तयार करणार नाही.
- राजेंद्र प्रसादे, प्रसादे गणेश चित्रशाळा
---