ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 17 ऑगस्ट रोजी वयाच्या 69 व्या वर्षी निधन झालं असून, त्या ठरलं तर मग मालिकेत पूर्णा आजीची भूमिका करत होत्या.
उपचारासाठी त्या पुण्यात गेल्या होत्या, पण उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं, ज्यामुळे मराठी इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला.
अभिनेत्री जुई गडकरीने त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली तसेच पुण्यात झालेल्या त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावली.
Jui Gadkari Viral Post : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 17 ऑगस्टला वयाच्या 69 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी सिनेइंडस्ट्रीला धक्का बसला. त्या ठरलं तर मग या मालिकेत काम करत होत्या. या मालिकेत सायली ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या.
ज्योती चांदेकर मृत्यूपूर्वी ठरलं तर मग या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांनी साकारलेली ही भूमिका खूप हिट झाली होती. मालिकेच्या शुटिंगमधून काही दिवसांचा ब्रेक घेत त्या उपचारासाठी पुण्याला गेल्या होत्या. पण उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. यामुळे मालिकेच्या संपूर्ण टीमला धक्का बसला. जुईने पुण्यात पार पडलेल्या ज्योती यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. सोशल मीडियावर तिने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
ती म्हणाली,"तशी तिची आणि माझी पहिली भेट २०१० साली बाजीराव मस्तानी या मालिकेच्या सेटवर झाली.. आम्ही एकाच मेकपरुम मध्ये बसायचो.. तिची काम करण्याची पद्धत बघुन मी हुरळुन गेले होते.. आळवणात ही कोण ईतकं सुंदर कसं दिसु शकतं असा प्रश्न पडायचा..
मग २०२२ साली ठरलं तर मग ला पुन्हा आम्ही भेटलो… आधी आहो ज्योती ताई, मग अगं ज्योती ताई, मग पुर्णाआजी, मग फक्त आजी आणि नंतर “माझी म्हातारी” अशी आमची मैत्री वाढली होती… म्हातारीला सगळ्याची आवड!! माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवेल अशी छान नट्टापट्टा करायची… छान साड्या, दागीने खास स्वतःचे, नव नवीन कॅासमेटीक्स, जेल पॅालीश ई अशा सगळ्याची तीला खुप आवड!!"
"मला मुळात आजी आजोबा खुप आवडतात.. माझी आजी २०१५ साली गेली.. पण ता नंतर मला माझ्या म्हातारीत माझी आजी पुन्हा भेटली… तशीच गोड गुबगुबीत.. तीच्या स्पर्षाची एक वेगळी ऊब होती आणि म्हणुन मी सतत तिच्या अंगा अंगाशी करायचे… तिच्या मांडीत बसायचे.. अंगावर रेलुन झोपायचे… तिचे हात धरायचे.. तिला लाडाने माझी नखं लावायचे.. त्यावर ती प्रेमाने मला “आलं माझं मांजराचं पिल्लु” असं म्हणायची… ४-४.३० झाले कि तिचा खाऊचा पिटारा ऊघडायची… त्यात काय काय असेल ते सगळ्यांना द्यायची..बरेचदा त्यात चिप्स, चकल्या, शेव ई असायचं.. त्यावरुन माझा रोज ओरडा खायची… गोड माझ्यापासुन लपवुन खायची आणि पकडलीच जायची.. कित्येकदा मी तिच्या तोडातुन भजी, गुलाबजाम बाहेर काढलेत.. पण म्हातारी ऐकायची नाहीच… पुण्यावरुन येताना आवर्जुन सगळ्यांसाठी क्रीमरोल आणायची! एकदा मी तिला जरा जास्तं ओरडले.. जेजे करायचं नाही तेच के करतेस असं खुप बोलले… त्यावर मला म्हणाली “मला पंडीतांकडे जायचंय”… आणि मी सुन्न पडले… त्यापुढे मी ना तिला ओरडु शकले ना काही बोलु शकले… कोणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपणा असु शकेल काही सांगता येत नाही.. जेवायला आवर्जुन माझ्या शेजारी बसायची.. मग माझ्या डब्यातलं काय असेल ते आवडीने खायची.. “जुया फदफदं आण ना” असं म्हाणाली होती आणि मी ते करुन नेल्यावर खासच खुश झाली होती!!"
"तिच्या घरातल्या तिच्या केअरटेकर मावशी तिला रोज डबा द्यायचा! बरं, त्या हिच्यापेक्षा बऱ्याच तरुण तरी त्यांना ही “म्हातारी” म्हणायची!! माझ्याकडचं पेन रीलीफ ॲाईल बरेचदा विकत घ्यायची… पाय सतत सुजलेले असायचे तिचे.. हट्टी होती कधी सेटवर कोणी ओरडलंच तर रडायची ही अगदी लहान मुलासारखी… पण माझी म्हातारी काम काय सुंदर करायची! डायलॅागचं प्रॅांमटींग घेतलं तरी त्यात “जान” भरुन ते डीलीव्हर करायची… कधी करारी तर कधी प्रेमळ असे पटकन तिचे डोळे बदलायचे! तिच्याबरोबर मी खुप सीन केले ज्यात आमचं पर्सनल नातं तयार झालं.. तिच्यात मला माझी आजी दिसायची.. तिचे पाय चेपुन देणाचे सीन तिला भरवण्याचे सीन मी मनापासुन एन्जॅाय करायचे.. माझा पहिला ॲानसक्रीन पापी घेण्याचा सीन मी तिच्या बरोबरच केला! आणि मग तिच्या सतत पाप्या घेणं, तिला मीठी मारणं हे सीन मध्ये आपसुक व्हायचं… तिच्याबरोबरचे सीन करायला कधी ग्लीसरीन नाही घ्यावं लागलं.. मी तिची खुप चेष्टा करायचे पण तिचा मोठेपणा कि तिनी ते मनाला कधीच लाऊन घेतलं नाही… मला तिच्या काठीने फटके द्यायची पण रागावली कधीच नाही.. बरेचदा आजारी असायची.. त्यावर आम्ही तिला म्हणायचो असं म्हण मी बरीए.. मग बरी होशील.. बरेचदा सेटवरुन हॅास्पीटलला नेलं तिला.. पण ती परत यायची.. परत सुंदर दिसायची… मस्ती करायची… याही वेळेला वाटलं होतं तु परत येशील… पुढच्या १० दिवसात आपण ९०० भाग पुर्ण करतोय गं.. अजुन कितीतरी काम करायचं बाकी होतं.. तुझयाकडुन अजुन खुप शिकायचं होतं… तुझ्या व्यातीरीक्त “पुर्णाआजी” म्हणुन दुसर्या कोणाला मी कशी एक्सेप्ट करु?? तुझी औषधाच्या वासांनी भरलेली खोली.. तुझा रेलीस्रपे चा परफ्युम! हे सगळं आता परत कधीच दिसणार नाही… आजही तुझ्या दागीन्यांनी भरलेले तुझ्या रुमचे ड्रॅाव्हर तसेच लॅाक आहेत आणि कदाचीत तसेच राहतील… तुला माझं लग्नं झालेलं बघायचं होतं.. मला म्हणायचीस मा ठणठणीत बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला… सगळं राहुन गेलं गं.. आपल्या मोनिकाच्या वृंदाला तुझा सहवास लाभला.. आशीर्वाद मिळाला हीच मोठी गोष्टं! अगदी परवा म्हणालीस ना गं मी येते पुण्याला जाऊन…"
"आज तिला स्मशानात असं शांत झोपलेलं बघुन खुप त्रास झाला..एका क्षणात सगळं शांत झालं होतं… कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खुप आनंदही देतात आणि त्रास ही… आजी तुझी ऊणीव कायम भासत राहील… तु परत येते सांगुन परत आलीच नाहीस…
आतातरी पंडीताबरोबर शांत.. सुखी राहा
॥ॐ शांती॥" असं म्हणत तिने तिच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
FAQs :
प्रश्न: ज्योती चांदेकर यांचं निधन केव्हा झालं?
उत्तर: 17 ऑगस्ट रोजी.
प्रश्न: त्यांच्या निधनाच्या वेळी त्यांचं वय किती होतं?
उत्तर: 69 वर्षं.
प्रश्न: ठरलं तर मग मालिकेत त्यांनी कोणती भूमिका साकारली होती?
उत्तर: पूर्णा आजीची भूमिका.
प्रश्न: जुई गडकरीने त्यांच्या निधनानंतर काय केलं?
उत्तर: सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आणि पुण्यातील अंत्यसंस्काराला हजेरी लावली.
प्रश्न: ज्योती चांदेकर पुण्यात का गेल्या होत्या?
उत्तर: उपचारासाठी.