Online Medicine Sales: ऑनलाइन औषधविक्रीवर बंदी घाला; पुणे केमिस्ट असोसिएशनची मागणी, गैरवापर वाढला
esakal August 19, 2025 05:45 AM

पुणे : पुण्यासह अखिल भारतीय औषध विक्रेत्या संघटनांनी औषधांच्या बेकायदा ऑनलाइन विक्रीबाबत सरकारला इशारा दिला आहे. संघटनेने ‘१० मिनिटांत औषध वितरण’ करणाऱ्या ई-फार्मसी कंपन्यांवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

ऑनलाइन औषध विक्रीद्वारे औषधांचा गैरवापर जवळपास ५५ टक्क्यांनी वाढला असून, त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतील, असेही त्यांनी नमूद केले. या मागणीला पुणे केमिस्ट असोसिएशनने पाठिंबा दिला आहे.

सध्या अनेक औषधांची ऑनलाइन विक्री होत आहे. या कंपन्यांकडे ऑनलाइन औषधेविक्रीचा परवाना नसल्याचे औषध विक्रेत्या संघटनेचे म्हणने आहे. प्रत्येकवेळी ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच दिली जातात, असे नसून त्याशिवायदेखील दिली जातात.

त्यात औषधे नेमकी कोठून येतात, ती योग्य तापमानात ठेवलेली असतात का? याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच त्याद्वारे गर्भपाताच्या गोळ्यांचीदेखील विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. ऑनलाइन औषधे विक्री करणारे ॲप नियमांचे उल्लंघन करत असूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही.

Nanded: मुखेडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, लेंडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं अनेक गावं पाण्याखाली; नागरिक अडकले, बचावकार्य सुरू

अखिल भारतीय औषध विक्रेत्या संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे व सचिव राजीव सिंघल यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन दिले आहे. ऑनलाइन औषध विक्रीला अजूनही कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. मुळात अन्न व औषध प्रशासन तसेच औषध आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार औषधांची फार्मासिस्टच्या देखरेखीखाली विक्री व्हायला हवी. अशा ऑनलाइन विक्रीद्वारे जर काही चुकीची औषधे आली, तर त्याचा दुष्परिणाम मोठा होईल, असे केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रीक्टचे अध्यक्ष अनिल बेलकर यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.