Satara News: बोंडारवाडीच्या ट्रायल पिटसाठी विरोध! 'रस्त्यावर महिला, युवकांचा ठिय्या'; गावांचा विरोध असताना जबरदस्ती..
esakal August 20, 2025 10:45 AM

केळघर : बोंडारवाडी धरणाच्या ट्रायल पिटसाठी (विंधन विवरे) पोलिस बंदोबस्तात आलेल्या अधिकाऱ्यांना आज बोंडारवाडीसह भुतेघर व वाहिटे येथील ग्रामस्थांनी विरोध केला. यावेळी महिलांसह युवक, ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. मेढा, केळघर विभागासह ५४ गावांच्या पिण्यासह शेतीसाठी महत्त्वाचा असलेल्या या धरणासाठी २०१३ पासून लढा सुरू आहे.

Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवड

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आज धरणरेषेजवळ ट्रायल पिट घेण्यात येणार असल्याने मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थांची बैठक घेऊन चर्चा केली. यामध्ये ट्रायल पिटला विरोध अथवा अडथळा निर्माण करू नये, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील अशा सूचना केल्या होत्या. त्यावेळी तीनही गावांतील ग्रामस्थांनी दोन दिवसांची मुदत मिळण्याबाबत पोलिसांना निवेदनही दिले होते.

दरम्यान, याबाबत माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले, की सुधारित रेषेवर धरण झाले तर पूर्णतः बोंडारवाडी, भुतेघर, वाहिटे ही गावे बाधित होणार आहेत. त्यामुळे या धरण रेषेस ग्रामस्थांचा विरोध आहे. धरणाची ट्रायल पिट ही बळजबरीने केली जात आहे. याबाबतचे निवेदनही तहसीलदार हणमंत कोळेकर यांना आज देण्यात आले आहे. यावेळी उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता अमर काशीद, सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

निवेदनातील माहिती अशी, की तीन गावांचा विरोध असताना जबरदस्तीने पोलिस बंदोबस्तात ट्रायल पिट केले जात आहे. याबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, संबंधित विभागाचे अधिकारी व तिन्ही गावांची बैठक गणेशोत्सवानंतर लावण्यात यावी आणि आमचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे.

नियोजित बोंडारवाडी धरणास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रत्यक्ष धरण रेषेवर ट्रायल पिट (विंधन विवरे) घेणे आवश्यक आहे. धरणामुळे अंदाजे ५५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, ५४ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. भूस्तर निश्चिती झाल्याशिवाय नियोजित धरणाचे अंदाजपत्रक करणे अशक्य आहे. त्यामुळे प्रशासकीय मान्यता प्रस्ताव शासनास सादर करण्यास विलंब होणार आहे, तरी सर्व संभावित प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी या सर्व गोष्टींचा विचार करून भूस्तर निश्चितीकरण करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

- अमर काशीद, कार्यकारी अभियंता, उरमोडी धरण

MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणी

प्रस्तावित बोंडारवाडी प्रकल्पासाठी मूळ धरणरेषेवरच करण्यात यावे. आता बदललेल्या धरण रेषेवर धरण झाले तर पूर्णतः बोंडारवाडी, भुतेघर, वाहिटे ही गावे बाधित होणार असल्याने या धरण रेषेला विरोध आहे. धरणाच्या ट्रायल पिटसाठीही विरोध असून, ग्रामस्थांची दिशाभूल करून ट्रायल पिट बळजबरीने केले जात आहे. खरोखरच ५४ गावांतील ग्रामस्थांना पाण्याची गरज आहे का? याचेही सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.

- अंकुश मानकुंबरे, सरपंच, भुतेघर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.