MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'
esakal August 21, 2025 10:45 AM

सातारा : उरमोडी प्रकल्पाच्या विस्तारित कामांसाठी ३०४२.६७ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास केंद्रीय जल आयोगाच्या प्रकल्प मूल्यांकन संघटनेच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती येऊन डिसेंबर २०२७ पर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील, तसेच दुष्काळी माण, खटाव आणि सातारा तालुक्यातील सुमारे २७ हजार ७५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन येथील शेतकरी सुखावणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवड

खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले, की कृष्णा खोरे विकास महामंडळाचा उपाध्यक्ष असताना राज्याच्या वाट्याला येणारे पाणी अडवून ते सिंचनासाठी वापरण्याचे नियोजन राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्याच वेळी पश्चिम भागातील उरमोडी नदीवर धरणाचे पाणी कण्हेर जोड कालव्याद्वारे व पुढे उरमोडी उपसा योजनेंतर्गत वाठार किरोली व कोंबडवाडी येथे दोन टप्प्यांत ४५० फूट उचलून खटाव व माण दुष्काळी भागास सिंचन सुविधा पुरविण्याचे नियोजन झाले.

त्याकरिता १४१७.१९ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती, तसेच २०१८ मध्ये उरमोडी प्रकल्पाचा समावेश केंद्र सरकारच्या बीजेएसवाय या योजनेत झाला. १४१७.१९ कोटींच्या मान्यतेच्या मर्यादा असल्यामुळे नंतरच्या काळात केंद्राचा निधी मिळण्यात मर्यादा येणार होत्या. याबाबतीत उरमोडी मोठ्या प्रकल्पाच्या सुधारित मान्यतेसाठी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन मागणी केली होती. याचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.


या पार्श्वभूमीवर नुकतीच केंद्रीय जल आयोगाच्या प्रकल्प मूल्यांकन संघटनेची बैठक जलशक्ती मंत्रालयात झाली. या बैठकीत २०२३-२४ च्या किंमत पातळीनुसार ३०४२.६७ कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.

MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणी

केंद्राकडून मिळणाऱ्या या निधीमुळे या प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती मिळून हा प्रकल्प डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. याकामी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच इतर मान्यवरांचे सहकार्य मिळाले आहे. त्याबद्दल दुष्काळी जनतेच्या वतीने या सर्वांचे मी आभार मानतो.

-उदयनराजे भोसले (खासदार, सातारा लोकसभा)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.