बारामती गणेश फेस्टिव्हलमध्ये यंदा कार्यक्रमांची रेलचेल
esakal August 21, 2025 10:45 AM

बारामती, ता. १९ : गणेशोत्सवानिमित्त यंदाच्या बारामती गणेश फेस्टिव्हलमध्ये रसिक बारामतीकरांसाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही विविध सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फेस्टिव्हलचे प्रमुख नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.
यंदाच्या बारामती गणेश फेस्टिव्हलच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार या उभयतांच्या हस्ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नटराज नाट्य कला मंदिर येथे केली जाणार आहे. यंदा २७ ऑगस्ट रोजी सप्तरंग धनू हा नृत्य, नाटिका, गीते, २८ रोजी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन, २९ रोजी ''आमने सामने'' विनोदी नाटक, ३० रोजी मराठी लावणी नृत्याचा कार्यक्रम, ३१ रोजी हिंदी चित्रपट गीतांचा ऑर्केस्ट्रा टोटल म्युझिक धमाका, १ सप्टेंबर रोजी बॉलिवूड आयकॉन्स ही सुपरहिट गाण्यांची मैफल, २ रोजी गुलजार यांच्या गीतांवर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम, ३ रोजी मराठी गीतांचा स्वर आले जुळूनी हा कार्यक्रम तर ४ रोजी मराठी लावणी नृत्याचा तुमच्यासाठी कायपण हा कार्यक्रम होईल. ५ रोजी दुपारी चार ते सहापर्यंत महिलांसाठी खेळ पैठणीचा होणार असून त्याच दिवशी स्थानिक कलावंताचा क-हेचे कलावंत हा कार्यक्रम सादर होईल. ६ सप्टेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक निघणार असल्याची माहिती किरण गुजर यांनी दिली. मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजता नटराज नाट्य कला मंदिर येथे होणार असून ते बारामतीकरांसाठी विनामूल्य खुले असतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.