खासदार सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती, या कार्यक्रमाचा एक फोटो देखील समोर आला होता, त्यावरून विरोधकांनी सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर सुनेत्रा पवार यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली होती. दरम्यान आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कुणी कुठे जायचं हा सर्वांना अधिकार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
कुणी कुठे जायचं हा सर्वांना अधिकार आहे. मला देखील कंगना राणावत यांनी बोलावलं होतं मी नाही म्हणून सांगितलं, सुनेत्रा पवार त्या कार्यक्रमाला गेल्या तर हा प्रश्न त्यांना विचारा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं असं एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं, यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली, याला देखील त्यांनी उत्तर दिलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधकांना विरोध टीका करण्याचा अधिकार आहे. माझ्या पांडुरंगाला मटण खालेलं चालतं, हे वक्तव्य दाखवले, परंतु माझं भाषण 36 मिनिटं चाललं, त्यामध्ये मी संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली, ते कोणी दाखवलं नाही, असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान विरोधकांकडून मतदान चोरी आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत, राज ठाकरे यांनी देखील यावर बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. भारतीय जनता पक्षाचे दोन नेते देखील म्हणाले आहेत की मतचोरी होत आहे. आणि आता भारतीय जनता पार्टी देखील आमच्या अभियानात सामील होत आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत बोलताना आंदोलन हा सर्वांचा अधिकार असल्याची प्रतिक्रियाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.