देवेंद्र फडणवीस नव्हे, 'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, संपत्ती तब्बल 931 कोटी
Tv9 Marathi August 25, 2025 02:45 AM

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या विधानसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. मात्र महाराष्ट्र जरी श्रीमंत राज्य असले तरी देवेंद्र फडणवीस हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री नाहीत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या वार्षिक यादीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एन चंद्राबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांची संपत्ती तब्बल 931 कोटी रुपये आहे. यातीस बहुतांशी संपत्ती ही त्यांच्या कुटुंबाच्या दुग्धजन्य रिटेल कंपनीतून मिळवलेली आबे. नायडू यांनी ही कंपनी 33 वर्षांपूर्वी स्थापन केली होती. एडीआरने गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या शपथपत्राच्या आधारे ही क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या शेवटच्या स्थानावर आहेत.

हेरिटेज फूड्स लिमिटेड कंपनीत पत्नीचा हिस्सा

हेरिटेज फूड्स लिमिटेड या कंपनीमुळे नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री बनले आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकणारी ही कंपनी 1992 मध्ये फक्त 7000 रुपयांच्या भांडवलासह सुरु झाली होती. ही कंपनी 1994 मध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड झाली होती. विशेष म्हणजे नायडू यांच्याकडे या कंपनीचा एकही शेअर नाही. मात्र नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी नारा यांच्याकडे कंपनीत 24.37 टक्के हिस्सा आहे, ही संपत्ती नायडू यांच्या एकूण संपत्तीत गणली जाते. नारा कुटुंबाकडे या कंपनीचा 41.3 टक्के हिस्सा आहे.

आमदार असताना झाली होती कंपनीची स्थापना

हेरिटेज फूड्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माह सांगितले की, ही कंपनी दुग्धजन्य पदार्थांची किरकोळ विक्री करणारी कंपनी आहे. ही कंपनी पायाभूत सुविधांसारख्या कोणत्याही क्रोनी कॅपिटलिस्ट क्षेत्रात नाही. या कंपनीला कोणतेही सरकारी अनुदान मिळत नाही. या कंपनीची प्रगती उत्पादनांच्या विक्रीवर अवलंबून आहे. चंद्राबाबू नायडू आमदार असताना या कंपनीची स्थापना झाली होती. ही कंपनी स्टॉक लिस्टेड झाल्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता ते देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.