Nashik News : देवळाली कॅम्पमध्ये भरधाव ट्रक घराच्या भिंतीला धडकला; जीवितहानी टळली, पण वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
esakal August 25, 2025 02:45 AM

देवळाली कॅम्प: येथील रेस्ट कॅम्प रस्त्यावर भरधाव हायवा ट्रक घराची संरक्षक भिंत तोडून आत घुसला. यात भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जीवितहानी टळली असली तरी या अरुंद रस्त्यावरील अवजड, भरधाव वाहतुकीचा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

रेस्ट कॅम्प रस्त्यावरील बनाचाळीजवळील रस्त्याच्या पूर्वेकडे फिरदौस पुनावाला व शमिना गणिजी यांचे निवासस्थान आहे. शुक्रवारी (ता. २२) रात्री अडीचच्या सुमारास सर्व जण झोपेत असताना अचानक मोठा आवाज आला. त्यामुळे सर्वांनी बाहेर येऊन पाहिले असता हायवा ट्रक भिंत तोडून शमिमा गणिजी यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीजवळ येऊन थांबलेला होता. शेजारच्या कुटुंबातील सदस्य गाढ झोपेत होते.

या घटनेत जीवितहानी टळली असली तरी रात्रभर सर्वजण जागेच होते. घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस दाखल झाले. तोपर्यंत गाडीचा चालक चावी घेऊन पसार झाला. पोलिसांनी सकाळी पंचनामा करू, असे सांगितले. मात्र फिरदौस पुनावाला व शमिमा गणिजी यांनी सांगितले, की रस्ता अरुंद आहे. मात्र या मार्गावर अवजड वाहने भरधाव जात असतात. त्यांच्यावर वाहतूक विभागाचे नियंत्रण नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Sugar Industry : ‘बायो सीएनजी’चे धोरण लवकरच; राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची घोषणा

अपघातांची मालिका सुरूच

दोनवाडे येथील शेतकरी लक्ष्मण वाळू शिरोळे यांना फेब्रुवारीतच केंद्रीय विद्यालयाजवळच असलेल्या वर्दळीच्या रेस्ट कॅम्प रस्त्यावर भरधाव डंपरने उडविले होते. त्यात शिरोळे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत रेस्ट कॅम्प रस्त्यावर अनेक अवजड वाहने आजही भरधाव जात आहेत. याच रस्त्यावर शाळा व धार्मिक स्थळ आहे. महसूल विभाग व शहर वाहतूक पोलिस कारवाई करत नसल्याने रेस्ट कॅम्प रोड रहिवासी पोपट फोकणे यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.