राहुल द्रविड याच्यानंतर भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये संकटमोचक म्हणून भूमिका बजावणाऱ्या चेतेश्वर पुजारा याने रविवारी 24 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पुजाराच्या निवृत्तीसह सुवर्ण युगाचा अंत झाला. पुजारा भारतासाठी कसोटीत सर्वाधिक वेळ खेळला. पुजाराने 2010 साली कसोटी पदार्पण केलं. पुजाराची कसोटी कारकीर्द जवळपास 15 वर्षांची ठरली. पुजाराने या दरम्यान भारताला आपल्या बॅटिंगने अशक्य अशा सामन्यांमध्ये विजयी केलं. पुजाराने गाबात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2020-2021 च्या दौऱ्यात भारताला सामन्यासह मालिका जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. पुजाराची ती खेळी क्रिकेट चाहत्यांना चांगलीच लक्षात आहे. पुजाराने भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानासाठी त्याचं बीसीसीआय, आयसीसी आणि आजी माजी क्रिकेटपटूंनी आभार मानले. तसेच पुजारासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
पुजारा 2025 मध्ये निवृत्त होणारा पाचवा भारतीय ठरला. पुजाराआधी रोहित शर्मा आणि विराट कोहली या चौघांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केला. तर ऋद्धीमान साहा आणि वरुण एरॉन या दोघांनी सर्वच प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. मात्र या यादीत येत्या काळात आणखी काही भारतीय खेळाडूंची नाव जोडली जाऊ शकतात, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. भारताचे 3 खेळाडू हे कधीही निवृत्ती जाहीर करु शकतात. ते कोण आहेत? जाणून घेऊयात.
मुंबईकर आणि मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे याने भारताचं 195 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. तसेच काही सामन्यांमध्ये रहाणेने नेतृ्त्वही केलं. रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 हजार 414 धावा केल्या आहेत. रहाणेला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून 2 वर्षांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. तसेच रहाणे 2018 नंतर एकदाही वनडे/टी 20i सामना खेळला नाही. तसेच आता कसोटी संघात युवा खेळाडूंनी आपला जम बसवला आहे. त्यामुळे रहाणेचं कसोटी संघात कमबॅक होणं अवघड असल्याचं दिसत आहे.
भारताचा फिरकीपटू अमित मिश्रा याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र अमितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. मात्र इथून अमितचं कमबॅक होणं अशक्य आहे. अमितने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2017 साली खेळला होता. तसेच अमितने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 156 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अमितचं 42 वय आहे. त्यामुळे अमित लवकरच निवृत्ती जाहीर करु शकतो.
करुण नायर याला निवड समितीने देशातंर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंड दौऱ्यासाठी संधी दिली. मात्र करुण या संधीचं सोनं करु शकला नाही. करुणला इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील 4 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र करुणला या 8 डावांमध्ये फक्त 205 धावाच करता आल्या. त्यामुळे करुणला इथून पुढे संधी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे.