जालना : गणेशोत्सवाला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी विविध वस्तूंनी बाजारपेठा सजल्या असून, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह विद्युत रोषणाईसाठीच्या माळाही दाखल झाल्या आहेत. सजावटीच्या विविध वस्तू भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
गणेशोत्सवात सजावट आणि आरास करण्यासाठी लायटिंगचा आवर्जून वापर केला जातो. त्यासाठी लागणाऱ्या रंगीबेरंगी, देशी-विदेशी आकर्षक लायटिंग बाजारात आल्या आहेत. यावर्षी यूएसबी लाइटच्या माळांना भाविकांकडून अधिक मागणी आहे.
आकर्षक लायटिंग खरेदी करण्यासाठी गणेश मंडळांसह घरात बसविणाऱ्या भाविकांनी बाजारपेठेत गर्दी केली आहे. दरम्यान, बाजारात विविध प्रकारच्या आणि आकर्षक लायटिंग विक्रीसाठी आल्या आहेत.
यामध्ये पारंपरिक माळा, इलेक्ट्रॉनिक दिवे तोरण, झाडांच्या फुलमाळा, झाडांचे वेल, झुंबर, फुले, लाइट फोकस, रंगीबेरंगी लेझर लाइट्स, समई, निरंजन, पणत्या माळा, मोदक, रंगीबेरंगी लाइटची फुले, पणत्यातील गणपती, चक्री लाइट, फिरते लाइट्स, थ्रीडी लाइट्स, डिस्को लाइट, विद्युत लाइट, विद्युत पडदे अशा विविध १०० ते १५० प्रकारच्या लायटिंग विक्रीसाठी आल्या आहेत.
विविध लायटिंगच्या किमती
यूएसबी लायटिंग : १०० ते १००० रुपये
एलईडी लाइट माळा : १०० ते ४०० रुपये
एलईडी समई, माळा, पणत्या, दिवे : प्रत्येकी २५० रुपये
लेझर लायटिंग : २५० ते ८०० रुपये
गौरी, गणेशोत्सवात सजावट, आरास करण्यासाठी रोषणाईचा वापर होतो. त्यामुळे नव्याने आलेल्या आकर्षक लायटिंग खरेदीवर भाविकांचा भर आहे. घरगुती, मंडळासाठी लागणाऱ्या मोठ्या लायटिंग सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. कॉपरच्या किमती वाढल्याने किमतीही वाढल्या. मात्र, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.
- रूपेश झुंगे, व्यावसायिक