Taloda News : मृत्यूनंतरही यातना संपेना; पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ
Saam TV August 25, 2025 08:45 AM

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या यातना संपत नसून मृत्यूनंतर देखील या यातना संपत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातच तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट येथे पूल नसल्यामुळे मृतदेहला नदीच्या वाहत्या पाण्यातून अगदी जीव धोक्यात टाकून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. 

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदातालुक्यातील धवळीविहीर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट गावामध्ये पुलाच्या अभावी सदरची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावाची स्मशानभूमी नदीच्या पलीकडे असल्याने स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. यामुळे स्मशानभूमीत मृतदेह नेण्यासाठी पुलाची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांना मृतदेह वाहत्या नदीच्या पाण्यातून घेऊन जावे लागले.

Ganesh Festival : चोर गणपतीची प्रतिष्ठापना; सांगलीत दीडशे वर्षांची आहे अनोखी परंपरा

दोरीचा आधार घेत पार केली नदी 

दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नदीतील पाण्याचा प्रवाह खूप वेगवान होता. त्यामुळे मृतदेह सुरक्षितपणे पलीकडे नेण्यासाठी दोरीचा आधार घ्यावा लागला. पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत ग्रामस्थ जवळपास दोन तास नदीच्या काठावर थांबले. मात्र, प्रवाह कमी न झाल्याने अखेर त्यांना त्याच परिस्थितीतून मृतदेह नदीच्या पलीकडे न्यावा लागला.

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; राज्यात २२ लाख एकर शेतीचे नुकसान, कृषी मंत्री भरणे यांची माहिती

अनेक वेळा केली पूल उभारणीची मागणी 
घटनेमुळे मृत्यूनंतरही आदिवासींना समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून आलं आहे. गावात पूल नसल्यामुळे स्थानिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या भागातील नागरिकांनी अनेक वेळा पुलाची मागणी केली आहे. तरी देखील अद्याप पुलाचे बांधकाम करण्यात आलेले नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये शासनाविरुद्ध तीव्र नाराजी आहे. या घटनेने प्रशासनासमोर आदिवासींच्या समस्यांकडे लक्ष देण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.