बदलापुरात पेव्हर ब्लॉक घोटाळा
कोट्यावधींचा चुराडा; मुख्याधिकाऱ्यांकडून कारवाईचे संकेत
बदलापूर, ता. २६ (बातमीदार) ः शहरात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत असतानाच पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्येदेखील मोठी अनियमितता असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. पालिकेकडून दीड कोटींच्या कामाची बिले काढून नवीनच लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक अवघ्या काही दिवसांतच उखडण्यात आले आहेत.
बदलापूर पालिकेतील ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याचा प्रकार समोर येत आहे. बदलापूर-कर्जत महामार्गाच्या काँक्रीटच्या रस्त्यालगत पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम दोन टप्प्यांत करण्यात आले होते. हे काम केल्यानंतर काही ठिकाणी तर नव्याने बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक अवघ्या दोनच दिवसांत विद्युतवहिनी टाकण्याच्या कामासाठी उखडले आहेत. यामुळे पालिकेच्या कामांची माहित इतर प्राधिकरण घेत नाही का, असा सवाल उपस्थित होत असून, समन्वयाच्या अभावामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असल्याचा आरोप होत आहे.
काम निकृष्ट दर्जाचे
या ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचेदेखील समोर आले आहे. कामाची निविदा काढत असताना त्यात नमूद केल्याप्रमाणे कच्च्या मालाचा वापर, कामाची उंची, दर्जा यात तफावत आहे. या कामात गोलमाल करून ठेकेदार आपली उखळ पांढरी करत असल्याचे समोर आले आहे. हे काम झाल्यानंतर पालिकेच्या अभियंत्यांकडून संबंधित कामाची कोणतीच पाहणी केली जात नाही. त्यामुळे ठेकेदार बिनधास्तपणे निकृष्ट दर्जाचे काम करून या कामांच्या बिलातून चांगल्या प्रकारचा आर्थिक नफा मिळवत आहेत.
बदलापुरात रस्ते आणि पेव्हर ब्लॉकची कामे म्हणजे ठेकेदारांची रोजंदारी झाली आहे आणि या कामातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. कात्रप येथील या रस्त्यावरदेखील पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी इतर कामांसाठी ते काढण्यातसुद्धा आले. या पैशांचा अक्षरशः चुराडा केला जातो. याची चौकशी करून ठेकेदारांवर कारवाईची गरज आहे.
- गौरी संजय, स्थानिक महिला
या कामासंदर्भातील संपूर्ण चौकशी केली जाईल, कामाचा दर्जादेखील तपासण्यात येईल. या कामाचा दर्जा निकृष्ट असेल तर, संबंधित ठेकेदाराचे बिल रोखण्यात येईल.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगर परिषद
दीड कोटीच्या कामाची फाईल गहाळ
पूर्वेकडील कात्रप विभागात पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम केले आहे. मात्र या कामांमधील दीड कोटींच्या कामाची एक फाईल पालिकेतून गहाळ झाली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून दिली आहे. या संदर्भात मारुती गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी या संदर्भात चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे सांगितले.