Mumbai Goa Highway : गणपतीसाठी कोकणवासीय गावाकडे निघाले, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, ५ किमीपर्यंत लागल्या रांगा
Saam TV August 27, 2025 02:45 PM
  • माणगाव परिसरात पाच किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प

  • गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांचा मोठा ओघ

  • पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न असूनही कोंडी कायम

  • प्रवाशांना गैरसोय, पण बाप्पाच्या स्वागताचा उत्साह कायम

सर्वांचा लाडका गणपती बाप्पा उद्या घराघरांत विराजमान होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोकणवासीय आपल्या गावाकडे मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. मुंबई व परिसरातून हजारोंच्या संख्येने गणेशभक्त कोकणात जाण्यासाठी निघाले असून, काहींनी रेल्वे, काहींनी एसटी व खासगी बस, तर अनेकांनी स्वतःच्या चारचाकी, दुचाकी वाहनांचा पर्याय अवलंबला आहे. परिणामी मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतुकीचा ताण निर्माण झाला आहे.

विशेषतः माणगाव शहराच्या हद्दीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. माणगावपासूनतब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोय झाली. वाहनांची वाढलेली संख्या आणि माणगावमधील अरुंद रस्ते यामुळे कोंडी अधिकच तीव्र झाली. एकीकडे कोकणात लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुकता, तर दुसरीकडे महामार्गावरील प्रचंड कोंडीमुळे प्रवाशांना त्रास अशा मिश्र भावना प्रवासादरम्यान जाणवत आहेत.

Ganeshotsav 2025: गणेशभक्तांसाठी लालपरी सज्ज, लातूरवरून २०० बस दाखल; मुंबई ते कोकण प्रवास होणार सुसाट

पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व अरुंद रस्त्यांमुळे पोलिसांच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या असल्या तरी नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

Ganeshotsav 2025: कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशभक्तांना टोलमाफी; पास कसा आणि कुठे मिळणार?

माणगावमधील गर्दीमुळे खासगी व एसटी बस उशिरा धावत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. यावर्षीही तेच चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवरही गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या स्वागताचा आनंद व उत्साह स्पष्ट जाणवत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.