पुणे : भूतान येथील एका तरुणीच्या असाह्यतेचा फायदा घेत नोकरीच्या आमिषाने तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तरुणीला तिच्या मायदेशात परत पाठविल्यानंतर तिने ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सगद्वारे जामिनाच्या अर्जावर आपली बाजू मांडत विरोध केला. त्यानंतर न्यायालयाने ‘रेड हाऊस फाउंडेशन’च्या शंतनू सॅम्युअल कुकडे, अॅड. विपिन बिडकरसह आठ जणांचा जामीन अर्ज फेटाळला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. टाकळीकर यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. याप्रकरणी ऋषीकेश गंगाधर नवले (४८), जालिंदर बडदे, उमेश शहाणे, प्रतीक पांडुरंग शिंदे (३६), सागर दशरथ रासगे (३५) आणि रौनक भरत जैन (३८) याचादेखील जामीन फेटाळण्यात आला.
हा प्रकार २०२० ते जानेवारी २०२५ दरम्यान नानापेठ येथील सदनिकेत, सरवे बिच, रायगड येथील बंगला व पानशेत येथील एका हॉटेलमध्ये घडला. आरोपींनी तरुणीला पार्टीच्यावेळी पावडर व पातळ द्रव पिण्यास देऊन तिला गुंगी आल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या गुन्ह्यातील आरोपींच्या खात्यावरून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झालेले आहेत.
शंतनू कुकडे याने रेड हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व आरोपींनी एका इराद्याने वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या व्यक्ती, तसेच महिलांसह पार्ट्या आयोजित करून आर्थिक देवाणघेवाण केली. यामध्ये गोरगरीब, निराधार महिलांचे, शोषण केले. फाउंडेशनच्या खात्यावरून १०० कोटींची आर्थिक उलाढाल झाली असल्याचेही तपासत निष्पन्न झाले आहे.
तरुणी घाबरली असल्याने तिने अत्याचार सहन केले, गुन्ह्याच्या तपासात तिने व्यथा सांगितली आहे. गुन्हा दाखल करायला झालेला उशीर आरोपींचे निंदनीय कृत्य लपवू शकत नाही. मुलीने कधीही लैंगिक शोषणाला परवानगी दिली नाही, त्यामुळे आरोपींचा जामीन फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली.