लोणावळा, ता. २९ : लखनौ येथील रेड ब्रिगेड यांच्या वतीने तुंगार्ली येथील गुरुकुल विद्यालयातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.
रेड ब्रिगेडच्या उषा विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक अनुष्का कालगुडे व बयाजी खुरंगे यांनी संयोजन केले. गुरुकुलच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या आठवी ते दहावीतील दीडशे विद्यार्थिनी सहभागी झाल्या. विद्यार्थिनींना कराटे, मार्शल आर्टच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करायचा? याविषयी प्रात्यक्षिक दाखवत मार्गदर्शन केले. विद्यालयातील शिक्षकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन स्वसंरक्षणाचे धडे घेतले.
महिला अत्याचार व लैंगिक शोषण याच्याविरुद्ध लढा देण्यासाठी लखनौ ‘रेड ब्रिगेड’ची उषा विश्वकर्मा यांनी पंधरा सहकार्यांच्या मदतीने २०११ मध्ये स्थापना केली. या संस्थेने खासगी तसेच शासकीय शाळांमधील दोन लाखांपेक्षा जास्त मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे.