Maratha Reservation : आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही; नाशिकमधून तीन हजार वाहने मुंबईकडे रवाना होणार
esakal August 30, 2025 08:45 AM

नाशिक: मराठा समाजाला इतर मागासवर्ग गटातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील शुक्रवार (ता. २९)पासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी मराठवाड्यातून मराठा कार्यकर्ते पोहोचत असताना नाशिकमधूनही अधिकाधिक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला. नाशिकमधून तीन हजार वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे.

श्री कालिकामाता देवस्थान ट्रस्टच्या आवारात बैठक घेण्यात आली. यात मुंबई येथील आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यात दहा हजार चारचाकी स्टिकर, २५ हजार दुचाकी व रिक्षा स्टिकर, तसेच १५ हजार झेंडे तयार करण्यात आले आहेत. त्याचे तालुकानिहाय वाटप करण्यात आले. मोर्चासंदर्भात शहरात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली. मराठा समाज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पाठिंबा देत आहे.

राज्य सरकारने मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली. मराठा समाजाला ओबीसीतून ५० टक्के आरक्षण मिळवून देणारच, असा निर्धार करण्यात आला. लढा फक्त आरक्षणाचा नाही, तर मराठा अस्तित्व, न्याय आणि स्वाभिमानासाठी आहे. आता आरक्षण घेऊनच मुंबईतून परतण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.

बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष नितीन सुगंधी, नाना बच्छाव, केशवअण्णा पाटील, नवनाथ शिंदे, आशिष हिरे, बंटी भागवत, प्रफुल्ल वाघ, शिवाजी फोकणे, राम निकम, संदीप बरे, संदीप हांडगे, विक्रांत गायधनी, सागर कातड, राजेंद्र शेळके, हिरामण वाघ, गणेश पाटील, नितीन काळे, सोमनाथ पाटील, अमोल देवरे, दीपक पवार, राकेश ठाकरे, दत्तात्रेय पवार आदी उपस्थित होते.

Maratha Protest : मराठ्यांच्या वादळाने मुंबईत वाहतूक कोंडी, फ्री वेनंतर जेजे फ्लायओवरही बंद; कोस्टल रोडवर वाहनांच्या रांगा

मुंबई गाठायचीच

आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मिळेल त्या वाहनाने पोहोचायचे, असा निर्धार करण्यात आला. मालेगाव, नांदगाव, मनमाड, येवला, लासलगाव, सिन्नर व इगतपुरी या ठिकाणांहून हजारो मराठा बांधव रेल्वेने पोहोचणार आहेत. निफाड, चांदवड, सटाणा, देवळा, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यातून लोकल, खासगी वाहने व बसने पोहोचतील. शुक्रवारी (ता. २९) सकाळी सातला ग्रामदैवत श्री कालिका माता मंदिरात दर्शन घेऊन मुंबईकडे आझाद मैदानावर कार्यकर्ते रवाना होतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.