मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. याआधी या आंदोलनासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र आता आणखी एका दिवसासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आता पोलिसांनी यावर भाष्य केलं आहे. ‘मुंबई पोलिसांना परवानगीसाठी अर्ज मिळाला आहे आणि त्यावर विचार सुरु आहे. निर्णय झाल्यावर आम्ही तुम्हाला कळवू’ असं पोलिसांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आधी केवळ एका दिवसाची परवानगी दिली होती. मात्र जरांगे पाटील यांनी आमच्या सर्व मागण्या या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असं विधान केलं होते. तसेच जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनासाठी अर्ज करण्यात आला होता, आता त्या अर्जावर विचार सुरु आहे. आता किती दिवसांची मुदतवाढ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आंदोलनाला मुदतवाढ देण्यात बाबत सकारात्मक विधान केलं होतं. पत्रकारांनी फडणवीसांना जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या मुदतवाढीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होती की, ‘जरांगे पाटलांनी आंदोलनासाठी पुन्हा परवानगी मागितलेली आहे. उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्या कायद्याच्या चौकटीत राहून पोलिस या परवानगीचा सकारात्मक विचार करतील.’
तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न – मुख्यमंत्रीपुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या आंदोलनाद्वारे जरांगे पाटलांनी ज्या मागण्या मांडल्या आहेत त्यावर तोडगा काढण्याचाही सरकारचा प्रयत्न आहे. आम्ही यासाठी एक उपसमिती तयार केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यावर समितीचा विचार सुरु आहे. यावर कायदेशीर मार्ग काढावा लागणार आहे. फक्त आश्वासन देऊन चालणार नाही. संविधानात बसणारे मार्ग कसे काढता येतील असा सरकारचा प्रयत्न आहे. या आंदोलनामुळे दोन समाज एकमेकांसमोर उभे राहतील अशी परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहु नये असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी ओबीसी समाजालाही सांभाळावे लागेल आणि मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल.