नवी मुंबईतील सिडको क्षेत्रात आणि पनवेल महापालिकेला पाणी पुरवण्याची क्षमता असलेल्या हेटवणे जलावर्धन योजनेने बोगदा निर्मितीत राष्ट्रीय विक्रम नोंदवत प्रगतीचा नवा टप्पा गाठला आहे.या कामगिरीमुळे नवी मुंबईकरांच्या वाढत्या पाणीपुरवठ्याच्या गरजा भागविण्यास मोठा हातभार लागणार आहे.सिडकोच्या वॉटर टनेल पॅकेज-१ अंतर्गत जुलै २०२५ मध्ये अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने ३.२ मीटर व्यासाच्या बोगद्यात टनेल बोरिंग मशीन (टीबीएम)‘फ्लेमिंगो’च्या साहाय्याने केवळ एका महिन्यात तब्बल ७७७ मीटर लांबीचा बोगदा खोदण्याची ऐतिहासिक कामगिरी करीत स्वत:चाच आधीचा विक्रम मोडला आहे
या बोगद्यामुळे देशात बोगदा खोदकामाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. पॅकेज-१ मधील एकूण ८.७ किमी लांबीच्या बोगद्यांपैकी, अफकॉन्सने आतापर्यंत ३.४ किमी लांबीचे बोगदे खोदण्याचे काम वेगाने पूर्ण केले आहे.अफकॉन्सने जुलै २०२४ मध्ये मुंबईतील अमर महाल II बोगदा प्रकल्पासाठी याआधी प्रस्थापित केलेला ६५३ मीटरचा राष्ट्रीय मासिक विक्रम मोडला आहे. यापूर्वी मे महिन्यात अफकॉन्सने एका महिन्यात ७१४ मीटर खोदकाम पूर्ण करून खळबळ उडवली होती.आता त्यावर आता मात करत त्यांनी नवा इतिहास रचला आहे.
या विक्रमाने राष्ट्रीय बोगदा खोदकामात एक नवा मानक निर्माण झाला आहे. यातून आव्हानात्मक पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने आणि अचूकतेने पूर्ण करण्याची प्रकल्प टीमची क्षमता दिसून येते. आम्ही हीच गती टिकवून ठेवण्यास कटिबद्ध आहोत आणि पुढील काही महिन्यांत आणखी मोठी कामगिरी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे अफकॉन्सचे संचालक आर.अनंतकुमार यांनी सांगितले.
हा विक्रम साध्य करण्यासाठी अफकॉन्सच्या टीमला अनेक तांत्रिक आणि लॉजिस्टिक अडचणींवर मात करावी लागली. बोगद्याचे खोदकाम सह्याद्री प्रदेशातील कठीण भूगर्भीय रचनांमधून केले जात असल्याने खोदकाम अधिक अवघड होते.
जागेच्या मर्यादांमुळे उपकरणांच्या स्थापनेवर आणि हालचालींवर अडथळे आले. त्याशिवाय, ४ किमीच्या कठीण मार्गावरून साहित्याची वाहतूक करावी लागली. या परिस्थितीत बोगदा अनुकूल धोरणांचा अवलंब करून आम्ही काम पुढे नेले,असेही अनंतकुमार यांनी स्पष्ट केले.