उद्धव ठाकरे, शरद पवारांमध्ये दम असेल तर… मराठा आंदोलनावरुन गुणरत्न सदावर्तेंचा संताप
Tv9 Marathi August 30, 2025 08:45 AM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. सध्या मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत साधारण १० ते १२ हजार आंदोलक हे मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानात पोहोचताच त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. आता या आंदोलनावरुन एक नवा वाद निर्माण झाला आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनावर आणि मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी हे आंदोलन संविधानविरोधी, देशविरोधी आणि राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचवणारे असल्याचं म्हटलं आहे.

मराठा आंदोलकांनी मुंबईच्या दळणवळणाला आणि जनजीवनाला मोठा अडथळा निर्माण केला आहे. २९ ऑगस्टची निवड जाणीवपूर्वक गणेशभक्तांची गैरसोय करण्यासाठी केली आहे. मुंबईतील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग करून जागतिक पातळीवर शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलकांनी रस्ता रोको करून दळणवळण पूर्णपणे थांबवलं आहे. हे कृत्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा थेट भंग करणारं आहे. त्यामुळे पोलिसांनी जरांगे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.

मुंबईतील लोक हिंदुस्तानी नागरिक नाहीत का?

या आंदोलनातून जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तातडीने हे आंदोलन थांबवावं. हे आंदोलन म्हणजे मनोज जरांगेंचा फक्त मुखवटा आहे. राजकारण हा या आंदोलनाचा आत्मा आहे. हे आज सिद्ध झालेले आहे. आज आपण पाहिलं की कोण कोण होते. उद्धव ठाकरे मुंबईत लोक राहत नाहीत का? मुंबईतील लोक हिंदुस्तानी नागरिक नाहीत का? गणेशभक्त मुंबईतील रहिवाशी नाहीत का? आणि उद्धव ठाकरे यांची मुकसंमती, त्यांचं व्यक्त होणं, स्वागतार्ह भाष्य हे लक्षात आणून देतंय यात उद्धव ठाकरेंचं किती सहभाग आहे? असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

शरद पवारांच्या राजकारणात किती दम

कारण उद्धव ठाकरेंचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांच्या मंचावर जातात, उद्धव ठाकरे आधी पाठिंबा हो नाही हो नाही करतात, हे काय नाटक होत का, अर्थात हे आंदोलन शिवसेना ठाकरे गटाचंही हे आंदोलन आहे का, हे जर त्यांच्या दम असेल तर त्यांनी सांगावं. त्यांनी आता सत्य बोलावं. किती गाड्या दिल्या, किती माणसं जमली हे सांगण्याचे धाडस शरद पवारांनी सांगावं. शरद पवारांच्या राजकारणात किती दम आहे, हे देखील मला पाहायच, अशी टीकाही गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.