ओडिशातील भुवनेश्वर येथे पोलिसांनी एका अशा व्यक्तीचा पर्दाफाश केला आहे, जो यूट्यूब चॅनेलवर गुन्हेगारीमुक्त जीवन जगण्याचा आणि वाईट कामांपासून दूर राहण्याचा धडा शिकवत होता. या व्यक्तीने ‘चेंज योर लाइफ’ नावाचे यूट्यूब चॅनेल सुरु केले होते आणि दिवसा लोकांना गुन्हेगारीमुक्त जीवन जगण्याचे धडे देत असे. पण रात्री स्वतः चोरीच्या घटना घडवत असे. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि तपासात समोर आले आहे की त्याच्यावर 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. नेमकं प्रकरण काय? चला जाणून घेऊया…
चोराची ओळख
या चोराची ओळख मनोज सिंह अशी आहे. त्याला भरतपुर पोलिसांनी खंडगिरी बाडी येथून बुधवारी अटक केली. मनोज हा कटकचा रहिवासी आहे आणि त्याने सेल्फ हेल्प गुरू म्हणून ऑनलाइन आपली ओळख निर्माण केली होती. तो दररोज आपल्या ‘चेंज योर लाइफ’ यूट्यूब चॅनेलवर गुन्हेगारीमुक्त आणि तत्त्वांनुसार जीवन जगण्याचे व्हिडिओ पोस्ट करायचा. मनोज सिंहने 14 ऑगस्ट रोजी भरतपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 200 ग्रॅम सोन्याची चोरी केली होती. पोलिसांनी त्याच्याकडून 200 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपये रोख जप्त केले आहेत. तपासात असेही समोर आले की, त्याच्याविरुद्ध 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये अनेक चोरीच्या घटनांचा समावेश आहे.
वाचा: वाल्मिक कराडने तुरुंगात मागितलेली ती मशीन थेट बिग बॉस १९च्या घरात, नेमकं कारण तरी काय?
पर्दाफाश कसा झाला?
मनोजचा पर्दाफाश खंडगिरी बाडी येथे चोरीची माहिती मिळाल्यानंतर झाला. पोलिसांनी चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला आणि मनोजच्या हालचालींवर लक्ष ठेवले. सुमारे एक आठवड्यापासून त्याच्यावर नजर ठेवली जात होती, आणि अखेरीस त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, फिंगरप्रिंट्स आणि ऑडिट अहवालाच्या आधारे त्याला या फसवणुकीचा मास्टरमाइंड ठरवले. ज्या घरात मनोजने 14 ऑगस्टला चोरी केली, त्या घराच्या मालकिणीने सांगितले की, त्या वेळी त्या आणि त्यांचे पती घरी नव्हते. त्या ऑफिसमध्ये होत्या आणि त्यांचे पती एका मीटिंगमध्ये होते. दुपारी साधारण 2 वाजता त्यांचे पती घरी परतले तेव्हा त्यांना मुख्य दरवाजा आणि लॉकर रूमचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांचे सर्व सोन्याचे दागिने आणि 5 लाख रुपये रोख गायब होते.
पोलिसांचे आवाहन
पोलिसांनी जनतेला सावध राहण्याचे आणि ऑनलाइन ओळखीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मनोजच्या या कृत्याने लोकांना धक्का बसला आहे, कारण तो स्वतःला प्रामाणिक आणि अनुशासित जीवनाचा उपदेशक म्हणून सादर करत होता, पण प्रत्यक्षात तो एक सराईत चोर होता.