Manoj Jarangae Patil Protest : मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातनू आरक्षण द्यावे, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी मुंबईत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन चालू झाले असून त्यांच्या समर्थनार्थ हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही. मला गोळ्या घातल्या तरी चालेल पण आरक्षण घेऊनच जाणार, असं जरांगे यांनी म्हटले आहे. असे असतानाच आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांना कात्रीत पकडले आहे. एका नियमाचा आधार घेत सदावर्ते यांनी जरांगे यांच्याविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. सदावर्ते यांच्या या निर्णयामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सदावर्ते यांनी नेमकं काय केलं आहे?गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी याआधी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सदावर्ते यांनी कायद्याचा आधार घेत जरांगे यांच्याविरोधात दंड थोपडले आहेत. जरांगे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे सदावर्ते यांनी जरांगे यांच्याविरोदात ऑनलाईन पद्धतीने एक तक्रारही दाखल केली आहे.
अटी-शर्तीचे केले उल्लंघनमनोज जरांगे यांना यांना 29 ऑगस्ट रोजी फक्त सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करण्याची परवानगी होती. जरांगे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे, पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केले आहे. तसेच कायद्याचे फक्त उल्लंघन केलेले नाही तर त्यांनी कायदा मोडून-तोडून काढले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठी कारवाई व्हावी, अशीही मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीआझाद मैदानात 5000 लोकांपेक्षा जास्त गर्दी झालेली आहे. अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि रस्ता रोको झालेले आहे. सर्वसामान्य नागरिकाचे हाल होत आहेत, असा आरोपही सदावर्ते यांनी केला. तसेच मनोज जरंगे यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय जाधव , विजयसिंह पंडित, ओमराजे निंबाळकर, बजरंग सोनवणे यांच्यासह आंदोलनाला राजकीय समर्थन देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे आता नेमके काय होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.