Kolhapur Municipal News : थेट पाईपलाईन योजनेतील तिसऱ्या पंपाच्या दुरुस्तीत महापालिकेच्या यंत्रणेला सहाव्या दिवशीही यश आले नाही. पाणीपुरवठा बंद व टॅंकरही गायब झाल्याने शहरवासीयांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली. त्यांची दिवसभर पाण्यासाठी फरफट झाली. ऐन गणेशोत्सवामध्ये झालेल्या या प्रकाराने संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून महापालिकेचा जोरदार निषेध करत प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली. त्यामुळे आजपासून ए, बी व ई वॉर्डमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.
दरम्यान, दिवसभरात ३१ टॅंकरनी ९८ फेऱ्यांद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला. थेट पाईपलाईन योजनेत बुधवारी मध्यरात्रीपर्यंत नवीन किट बसवून चाचण्या घेतल्या; पण त्यातील दोष दुरुस्त होत नसल्याने पहाटे चारपर्यंत प्रयत्न करण्यात आले. तरी पंप सुरू करता आला नसल्याने दुरुस्तीसाठी एबीबी कंपनीच्या अभियंत्याला पाचारण करण्यात आले. त्याच्याकडून दिवसभर संगणक प्रणालीतील तसेच पंपाच्या यंत्रणेतील सारे दोष दूर करण्याचे टप्प्याटप्प्याने प्रयत्न केले जात होते. ही सर्व प्रक्रिया यशस्वी झाली तरच पंप सुरू होणार आहे. त्यामुळे महापालिकेने गेल्या दोन दिवसांतील अनुभव घेता, दुरुस्ती कामासाठी जादा वेळ लागेल, असे गृहित धरून आज निर्णय घेतले.
Kolhapur Politics : शौमिका महाडिकांचा हसन मुश्रीफांना सवाल, ‘महाविकास’च्या नेत्यांना किती जवळ करणार?ए, बी तसेच ई वॉर्डमध्ये एकाचवेळी पाणी दिले जात असल्याने पुरेशा दाबाने पाणी मिळत नव्हते. अनेक उंच भागात सलग चार ते पाच दिवस पाणीच मिळाले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत आजपासून निम्म्या शहरात दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन सुरू केले. त्यानुसार आज ए व बी वॉर्डमध्ये पाणी देण्यात आले. त्यामुळे अनेक भागात दुपारनंतर पाणी मिळाले. उद्या (ता.२९) ते बंद करून ई वॉर्डमधील भागांना पाणी दिले जाणार आहे. याशिवाय गरज असणाऱ्यांना टॅंकर दिले जाणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहायक आयुक्त व इतर अधिकाऱ्यांना टँकर वितरणाच्या कामावर उपस्थित राहण्याचे आदेश प्रशासकांनी दिले. सी व डी वॉर्डला मात्र नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
गुरुवारी पाणी वितरण झालेला भाग
ए, बी वॉर्ड, संलग्न उपनगर, ग्रामीण भागांतर्गत पुईखडी परिसर, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी नगर परिसर, आपटेनगर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, नानापाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखेनगर, राजीव गांधीनगर, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, आयटीआय परिसर, जोगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, बालाजी पार्क, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, शेंडापार्क आदी भागात पाणी मिळाले.
दिवसात ९८ फेऱ्यांद्वारे पाणी
दिवसभरात महापालिकेच्या, खासगी अशा ३१ टँकरच्या ९८ फेऱ्यांद्वारे विविध भागांत पाणीपुरवठा करण्यात आला. कळंबा फिल्टर हाऊस येथून खासगी १६ व महापालिकेचे दोन अशा १८ टँकरनी ५६ फेऱ्या केल्या. कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून खासगी ११ व महापालिकेचे २ अशा १३ टँकरनी ४२ फेऱ्या केल्या.