“आज सकाळी आंदोलक त्या ठिकाणी आलेले आहेत. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी सर्वांना आवाहन केलेले आहे की, आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे. त्यांची भूमिका सहकार्याची आहे, आमची शासनाची भूमिका सुद्धा सहकार्याची आहे. पहिल्यादिवसापासून सांगितलेलं आहे, की लोकशाही पद्धतीने आंदोलन चालत असेल, तर मनाई करण्याची गरज नाही. लोकशाहीत चर्चेने प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलन त्याचा एक मार्ग असतो. अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य हवं, ते उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहकार्य करत आहोत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. काही तुरळक ठिकाणी आंदोलनादरम्यान रास्तारोकोचे प्रकार घडले. पण पोलिसांनी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी सहकार्य केलं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यावर वाहतुकीत थोडे अडथळे येतात. या सगळया गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल. काही लोक वेगळ्या पद्धतीने वागतात, त्यामुळे संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं. अशाप्रकारे कोणी वागू नये, याकडे लक्ष द्यावं लागेल. मनोज जरांगे पाटील यांनी तसं आवाहन केलं आहे. कोणी अलोकतांत्रिक, आडमुठेपणाने वागू नये” असं मुख्यमंत्री म्हणाले. “शेवटी मी सगळ्या आंदोलकांना आवाहन करीन की, आज त्याठिकाणी जे काही चाललं आहे, ते उच्च न्यायालयाच्या निर्देशाने प्रशासन करत आहे. शासनाच्या निर्देशानुसार काही होत नाहीय. उच्च न्यायालयाने जी बंधन टाकली आहेत, ती प्रशासनाला सुद्धा पाळावी लागतील. लोकशाही मार्गाने प्रशासन सर्व सहकार्य करत आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आंदोलनाला दिवस वाढवून मिळणार का?
आंदोलनाला फक्त एकदिवसाची परवानगी होती, त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला वाटत त्यांनी पुन्हा परवानगी मागितलेली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस सकारात्मक विचार करतील. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रशासन सकारात्मक विचार करेल, त्यांच्या मागण्यांसंदर्भात जो काही मार्ग काढता येईल, तो काढण्याचा प्रयत्न आहे”
‘कायदेशीर मार्ग काढावे लागतील’
“आम्ही मंत्रिमंडळ उपसमिती बनवली आहे. कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही. संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील. काय मार्ग काढता येईल, यावर मी, एकनाथ शिंदे, अजितदाद संपर्कात आहोत. समितीने चर्चा करुन आमच्याशी चर्चा करावी. त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करु” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.