Theur News: 'जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच मतदार यादीतून नावे गायब'; थेऊर येथील मतदारांची नावे दुसऱ्याच मतदारसंघात
esakal August 30, 2025 06:45 AM

-सुवर्णा कांचन

उरुळी कांचन: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजण्याआधीच अनेक मतदारांची नावे चक्क दुसऱ्याच मतदारसंघात बदलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पूर्व हवेलीतील थेऊर गावात उघड झाला आहे. परिणामी, मोर्चे बांधणी करणाऱ्या स्थानिक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. जाणीवपूर्वक हे केले जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य योगेश काकडे, ग्रामस्थ सुजित काळे, सुमित कुंजीर यांनी केला आहे. तसेच याची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Rahuri Tobacco Raid : राहुरीमध्ये एलसीबीची माेठी कारवाई! 'दोनशे टन सुपारीसह तंबाखू जप्त'; साडेआठ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

संकेतस्थळावर मतदान आयोगाकडून १९८ शिरूर-हवेली मतदार संघातून प्रसिद्ध झालेल्या यादीतून थेऊर गावातील वार्ड क्रमांक ६ या भागातील मतदारांची तब्बल ७० नावे ही वगळण्यात आलेली आहेत. तर १७० नावे ही अजूनही प्रलंबित आहेत. तर जानेवारी महिन्यात याच भागातील जवळपास ३५ नावे ही वगळण्यात आलेली होती. विशेष म्हणजे गावातील माजी उपसरपंचाचे नावे यादीतून वगळण्यात आले आहे.

अलीकडे मतदान प्रक्रियेत होत असलेल्या गोंधळानंतर थेऊर येथील युवा कार्यकर्ते योगेश काकडे, सुजित काळे आणि सुमित विलास कुंजीर यांनी थेऊर जिल्हा परिषद गटातील थेऊर गावची मतदारयादी तपासत असताना अचानक अनेक मतदारांची नावे गावच्या यादीतून गायब झाल्याचे निदर्शनास आले. ही नावे नेमकी कुठे गेली याचा शोध घेतल्यावर ती हडपसर मतदारसंघातील कोंढावा बुद्रुक, वडगाव शेरी मतदारसंघातील येरवडा येथे पाठवण्यात आल्याचे उघड झाले.

Ahilyanagar Flood News : 'अहिल्यानगर जिल्ह्यातील २२३ गावांना पुराचा धोका'; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज, धरणांमधून विसर्ग सुरू

नवविवाहित, नवमतदार बाहेरगावी काम करणारे कर्मचारी यांच्या नावांची पडताळणी न करता मतदारयादी प्रसिद्ध केली जात आहे. निवडणुकीस आणखी काही कालावधी शिल्लक असला तरीही निवडणुकीत आपणास काही फायदा व्हावा म्हणून हा मुद्दाम केलेला कुटील डाव आहे. तसेच आपल्या विरोधकांस मतदानाअगोदरच कोंडीत पकडण्यासाठी अशी खेळी आहे. दुसऱ्या मतदारसंघात नावे गेलेल्या कुठल्याही मतदाराने स्वतः कोणाकडेही नावे स्थलांतरित करण्यासाठी अर्ज केले नाहीत. गावातील मतदारांची नावे पुन्हा पूर्ववत मतदारयादीत समाविष्ट करण्यात यावीत, अशी मागणी योगेश काकडे, सुजित काळे आणि सुमित विलास कुंजीर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.