खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचे उद्घाटन
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची प्रमुख उपस्थिती; एक लाख खेळाडू सहभागी होणार
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) ः खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडासंग्राम महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार (ता. २९)पासून झाले. या सोहळ्याला खासदार डॉ. शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, माजी क्रिकेटपटू व खासदार हरभजनसिंग आणि विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, की क्रीडासंग्राम ही केवळ स्पर्धा नसून प्रेरणादायी चळवळ आणि तरुणाईला योग्य दिशेने नेणारी संकल्पना आहे. इनडोअर, आउटडोअर खेळांसोबतच लेझीम, प्रो गोविंदा, ढोलताशा स्पर्धा अशा भारतीय खेळांचाही यंदा क्रीडासंग्राममध्ये समावेश केला आहे. यामुळे जास्तीत जास्त खेळाडू या महोत्सवात सहभागी होऊ शकतील, असे ते म्हणाले. या महोत्सवाची विस्तृत माहिती ९३३८५६७५६७ क्रमांकावर उपलब्ध आहे. या क्रमांकाला मिस कॉल दिल्यास एक लिंक पाठवली जाईल, ज्यात महोत्सवातील स्पर्धेची माहिती मिळेल, असे ते म्हणाले.
अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यतीचा समावेश
१५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०२५दरम्यान अंबरनाथ, उल्हासनगर, दिवा, कळवा-खारेगाव, डोंबिवली, ठाणे, मुंब्रा येथे हा महोत्सव होणार असून, यात एक लाख खेळाडू सहभागी होतील. बॅडमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बुद्धिबळ, बॉक्सिंग, रायफल शूटिंग, कॅरम, ॲथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल, मल्लखांब, व्हॉलीबॉल, आर्चरी, टग ऑफ वॉर, पोहणे, हाफ मॅरेथॉन, अंडरआर्म क्रिकेट, बैलगाडा शर्यत अशा खेळांचा समावेश आहे.
जीवन विमा काढणार
यातील सहभागी खेळाडूंना त्यांच्या सुरक्षेसाठी जीवन विमादेखील काढण्यात येणार आहे, तर त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खेळाडूंना शिष्यवृत्तीदेखील देण्यात येणार आहे.