Gauri Jagran: गौराईचे थाटामाटात आगमन! घराघरात नवचैतन्य, मनोभावे पूजा; वाचा सविस्तर
esakal September 01, 2025 03:45 PM

शिवडी : महाराष्ट्रात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण साजरा करण्याच्या प्रथा प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ्या आहेत. रविवारी (ता. ३१) लाडक्या गौराईचे मुंबईतील लालबाग, परळ, काळाचौकी, शिवडी, भोईवाडा, नायगाव या भागासह ठाणे, नवी मुंबई, रायगडमध्ये वाजता-गाजत मोठ्या आनंदाने स्वागत करण्यात आले. तर सोमवारी (ता. १) मनोभावे पूजा करण्यात येणार आहे.

अनेक ठिकाणी गौरींना गणरायाची बहीण, काही ठिकाणी त्यांना गणरायाची आई म्हटले जाते. घराघरात सोमवारी ज्येष्ठागौरीचे पूजन करण्यात येणार असून तिच्या पूजनसाठी लागणाऱ्या साहित्यांनी बाजारपेठ गजबजली आहे. घरोघरी गौराईच्या स्वागताची तयारी मोठ्या उत्साहात आहे. तर आई गौरीला भरजरी साडी नेसवून तिचा ठुशी, नथ, हातात हिरव्या बांगड्या आदी पारंपरिक दागिन्यांनी साज शृंगार करण्यात आला आहे.

बॉल पॉइंट पेनचा शोध कोणी लावला?

त्याचबरोबर लेक घरी आल्याचा आंनद आणि उत्साह कायम ठेवत आपल्या लाडक्या आई गौराईची मनोभावे पूजा करण्यात येईल. सुहासिनी महिलांनी आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लागावे, यासाठी सर्वात महत्त्वाचा मान म्हणून गौरी पूजेसाठी सुपामध्ये ओवसा भरण्याची पद्धत आहे. यासाठी सुहासिनी महिला दरवर्षी नवीन सुप खरेदी करतात. त्यात विड्याची पाने, सुपारी, फुले, ओवसासाठी लागणारे बदाम, खारीक, खोबरे व वडे, खीर असा ओवसा भरून आई गौराईला नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा केली जाते.

पूजेच्या दिवशी रात्रभर सुहासिनी महिला गाणे गातात, नृत्य करतात. फुगड्या, गोंधळ घालून गौरी जागवतात. त्यामुळे घरोघरी गौराईचे लाड पुरवण्यात येणार आहेत. तिची आवड निवड लक्षात घेऊन तिचा नैवेद्य, शृंगार तसेच सजावट करुन तिची मनोभावे पूजा केली जाईल. पिढ्यानपिढ्या पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गावातील घरत कुटुंबियांकडे गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. आमच्याकडे आगमनाच्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवतात. तर, पूजनाच्या दिवशी गौराईचा तऱ्हेतऱ्हेचा थाट असतो. फळं, करंज्या, लाडू, पुऱ्या, सांजोऱ्या, बर्फी दाखवतात. दुपारी पुरणपोळी, खीर, पुरी, घावन, घाटल्या, आंबिल असा नैवेद्य गौराईला दाखवण्यात येतो, असे अक्षय गुरुनाथ घरत यांनी सांगितले.

गौरीसाठी नैवेद्य

गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवतात. तर, पूजनाला वेगवेगळ्या प्रांतानुसार तऱ्हेतऱ्हेचा थाट असतो. फळं, करंज्या, लाडू, पुऱ्या, सांजोऱ्या, बर्फी दाखवतात. दुपारी पुरणपोळी, खीर, पुरी, घावन, घाटल्या, आंबिल तर, काहीजण माहेरी आलेल्या लेकीसाठी खास वडे, मटणाचाही नैवेद्य करतात. प्रत्येक भागानुसार नैवेद्याच्या प्रथा वेगवेगळ्या असल्या तरी; घरी आलेल्या लेकीला काहीही कमी पडायला नको असाच भाव मनात ठेवून आई गौराईचे लाड पुरवण्यात येतात.

Sharad Pawar: सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव, मुंबई पोलीस सतर्क; शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ! जागरण, गोंधळ

गणपतीच्या तिसऱ्या दिवशी गौरी म्हणजे माहेरवाशिण घरी येते, अशी आख्यायिका आहे. गौरी साधारणपणे तीन दिवस असतात. पहिला दिवस आगमनाचा, दुसरा दिवस पूजनाचा आणि तिसरा दिवस विसर्जनाचा. गौरींचे विसर्जन जिथे केले जाते, त्या नदी तलावातील काही दगड आणून ते घरी ठेवण्याची पद्धत आहे. सुखसमृद्धी आणि पिकांची भरघोस वाढ व्हावी, ही त्यामागची श्रद्धा आहे. विशेष म्हणजे गणेशाच्या मागोमाग आलेल्या गौरीचे आगमन, पूजन आणि विसर्जन हे दिवस ही अगदी सुखाचे असतात. माहेरवाशिणी आलेल्या गौराईला गोडा-धोडाचा नैवेद्य अर्पण करुन लाडक्या बाप्पाची देखील मनोभावे पूजा केली जाते. पाच दिवसांचा हा काळ भक्तांसाठी सुखाचा मानला जातो. आजही अनेक ठिकाणी जागरण- गोंधळ करत गौरी जागवल्या जातात. मंगळवारी (ता. २) गौरी विसर्जन होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.