पुण्यातील फरार आरोपीला कळव्यातून अटक
कळवा, ता. ३१ (बातमीदार) ः विविध गुन्ह्यांत फरार असलेला गुन्हेगार संजय गाडेकर याला कळव्यातील गोपाळरावनगरमधून कळवा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवार (ता. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास करण्यात आली.
पुण्यात विविध गुन्हे करून गेल्या काही दिवसांपासून संजय गाडेकर ऊर्फ रबाजी गाडेकर (वय ३५) हा फरार होता. त्याचा पोलिसांकडून सर्वत्र तपास सुरू होता. संजय हा कळव्यातील गोपाळराव पाटीलनगरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती सहपोलिस निरीक्षक विजय मोरे व दीपक जाधव यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने पाळत ठेवून शनिवारी रात्री संजयला ताब्यात घेतले. दरम्यान, वैद्यकीय तपासणी करून त्याला कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.