ठाणे, ता. १ : आईला भेटण्यासाठी मुलांसह गेलेल्या मुंब्र्यातील महिलेच्या घरातून ३५ तोळे सोन्याचे दागिने आणि २० हजार रुपये रोख असा २४ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरी गेला आहे. हा प्रकार ते वीजदेयक भरण्यासाठी पैसे काढण्यासाठी गेले असताना समोर आला. चोरट्याने बनावट चावीचा वापर करून ही चोरी केली असल्याचा संशय तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
हिना सुर्वे (वय ४६) या दोन मुलींसह मुंब्र्यात वास्तव्याला आहेत. त्यांचे पती आफ्रिकेत नोकरी करतात. पतीसोबत परदेशात राहत असताना त्यांनी सोन्याचे दागिने खरेदी केले होते. तसेच लग्नावेळी आई-वडिलांकडून मिळालेले असे एकूण ३५ तोळे वजनाचे दागिने त्यांच्याकडे होते. १५ ऑगस्ट रोजी दुपारी तन्वरनगर येथे राहणाऱ्या आईला भेटण्यासाठी मुलांसह घराच्या दरवाजाला कुलूप लावून गेल्या. तत्पूर्वी कपाटामधून खर्चासाठी पाच हजार रुपयेही काढले होते. त्या वेळी कपाटात त्यांनी ठेवलेले अंदाजे ३५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख २० हजार रुपये पाहिली होती. आईला भेटून संध्याकाळी परत घरी आल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने व पैसे पाहिले नाही. २३ ऑगस्ट रोजी वीजदेयक भरण्यासाठी कपाटात ठेवलेले पैसे काढण्यासाठी गेले असता, पैसे व सोन्याचे दागिने दिसून आले नाही. घरातील दरवाजावर खिडकीचा कडी कोंयडा पाहिले असता, ते व्यवस्थित असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी यासंदर्भात कुटुंबीयांना सांगून विचारपूस करून घरात सोन्याचे दागिने व रोख रकमेचा शोध घेतला, परंतु ते मिळून आले नाही. अखेर रविवारी (ता. ३१) मुंब्रा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.